कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये शहर जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच

दोन्ही पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांकडून लवकरच नियुक्‍ती संकेत : कॉंग्रेसमध्ये नियुक्‍ती रेंगाळण्याची शक्‍यता

नगर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांकडून जोरदार मोर्चाबांधणी सुरू झाली आहे. नुकत्याच नगर दौऱ्यात दोन्ही पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनी लवकरच नियुक्‍ती होणार असल्याचे संकेत दिले असले तरी इच्छुकांची संख्या पाहता त्यांच्या एकमताने ही निवड होणे अशक्‍य आहे. राष्ट्रवादीमध्ये थेट नियुक्‍ती होईल. पण कॉंग्रेसमध्ये पक्षांतर्गत वादामुळे ही नियुक्‍ती रेंगाळण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादीत माजी महापौर अभिषेक कळमकर, किरण काळे व संजय झिंजे, अंबादास गारूडकर तर कॉंग्रेसमध्ये युवकचे शहरजिल्हाध्यक्ष निखिल वारे, धनजंय जाधव, शहर ब्लॉक समितीचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ हे इच्छुक आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऐन महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांचा राजीनामा देण्यात आला तर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडीत भाजपला दिलेल्य पाठिंबाच्या कारणावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही कॉंग्रेसला शहरात सेनापती नाही. अर्थात महापालिका निवडणूक झाल्याने शहर जिल्हाध्यक्षपदासाठी फार कोणी इच्छुक नाही. परंतू लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून इच्छुकांची गर्दी वाढली आहे.

महापालिका निवडणुकीत स्वतःसह पत्नी शीला चव्हाण यांना उमेदवारी मिळवण्यात यशस्वी ठरलेले दीप चव्हाण यांनी त्याचवेळी शहर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाकडे दिला होता. मात्र, ऐन निवडणूक काळात पक्ष संघटना निर्णायकी होऊ नये म्हणून त्यांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी स्वतःकडे ठेऊन घेतला. त्यांनाच या पदावर काम पाहण्यास सांगितले होते. त्यानंतर महापालिका निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. मागील निवडणुकीत पक्षाचे 11 नगरसेवक असताना यावेळी केवळ पाचजण निवडून आल्याने चव्हाण हटाव मागणीला जोर आला होता. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण नगरला आले असताना काहींनी त्यांना निवेदन देऊन चव्हाणांना हटवण्याची मागणी केली होती. या पार्श्‍वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चव्हाणांनीही, चव्हाणांचा राजीनामा मंजूर केला असून, त्यांच्या जागी नव्या शहर जिल्हाध्यक्षाची नियुक्ती लवकरच करण्याचे जाहीर केल्याने या पदावर काम करू इच्छिणारांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, त्यांनी समर्थकांद्वारे नेत्यांकडे लॉबिंग करणे सुरू केले आहे.

जिल्हा कॉंग्रेसमध्ये उत्तरेतील दिग्गज नेते राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांतील गटबाजी प्रसिद्ध आहे. या गटबाजीच्या अलिखित नियमानुसार ग्रामीण जिल्हाध्यक्षपद विखे गटाकडे तर शहर जिल्हाध्यक्षपद थोरात गटाकडे देण्यात आल्याचे मानले जाते. चव्हाण हे थोरात समर्थक मानले जातात. या पार्श्‍वभूमीवर आता त्यांच्या जागी थोरात समर्थकाची वर्णी लागते की विखे गट हे पद मिळवतो, याची उत्सुकता आहे. सध्या तरी या पदाच्या रेसमध्ये निखिल वारे, धनंजय जाधव, ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांची नावे आहेत. मात्र, विखे व थोरात सांगतील त्याच्याच गळ्यात या पदाची माळ पडण्याची शक्‍यता आहे. सध्या तरी शहरात विखे गटाचे वर्चस्व निर्माण झाले आहे. थोरात गटाचे समर्थक बोटावर मोजता येईल. एवढेच शिल्लक आहे. त्यामुळे विखे सांगतील तो शहर जिल्हाध्यक्ष होण्याची शक्‍यता आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रा. विधाते हे आमदार संग्राम जगताप यांचे कट्टर समर्थक आहे. पक्षाने 18 नगरसेवकांसह शहरजिल्हाध्यक्षांवर कारवाई केली असली तरी आ. जगताप यांना अभय दिले आहे. त्यामुळे सध्या तरी आ. जगताप यांचे शहरात नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष असल्याने प्रा. विधाते ऐवजी त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची वर्णी लागू शकते. असे असले तरी माजी आमदार दादा कळमकर हे पुन्हा शहरात सक्रिय झाले आहेत. त्यांचे पक्षात चांगले वचन आहे. त्यामुळे आ. जगताप यांना बाजूला सारून ते कळमकर आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांची वर्णी लावू शकतात. सध्या इच्छुक असलेल्यापैकी अभिषेक कळमकर व किरण काळे हे कळमकर गटाचे आहेत तर संजय झिंजे हे आ. जगताप गटाचे आहे. यात कळमकर हे प्रबल दावेदार ठरत असल्याने कळमकर यांची शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्‍ती होण्याची शक्‍यता आहे. अर्थात ही निवड करतांना विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच ही निवड होईल.


कॉंग्रेसकडून जुन्यांना संधी मिळणार

शहर जिल्हाध्यक्षपदासाठी कॉंग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी असली तरी आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विखे गटाकडून नियुक्‍ती होणार आहे. जी नियुक्‍ती थोरात गटाला देखील मान्य असले. या पद्धतीने शहर जिल्हाध्यक्षपदाची नियुक्‍ती होईल. त्यासाठी पक्षातून अन्य पक्षात गेलेल्याची चाचपणी सुरू आहे. ज्यांनी मागील महापालिका निवडणुकीत सरचिटणीस म्हणून प्रभावी जबाबदारी पार पाडली. त्यांना पुन्हा कॉंग्रेसमध्ये घेवून शहरजिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)