कॉंग्रेस-राष्ट्रवादीने मुस्लीमांचा वापर केवळ मतांसाठी केला!

एमआयएमच्या आमदारांनी काढले वाभाडे

मुंबई- मराठा समाजाच्या मोर्चानंतर या समाजाच्या आरक्षणासाठी सर्व पक्षांनी एकजूट दाखवली. मात्र, हीच एकजूट मुस्लीमांच्या आरक्षणासाठी का दाखवत नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पंधरा वर्षे सत्तेत होती. सत्तेत असताना ते आरक्षण देऊ शकले नाहीत, मग आता कोठून देणार, असा सवाल करतानाच त्यांनी केवळ मतांच्या राजकारणांसाठीच मुस्लीमांचा वापर केला. मुस्लीम समाजाचा त्यांनी विश्वासघात केला, अशा तिखट शब्दात एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल यांनी या दोन प्रमुख विरोधी पक्षांवर टीका केली. त्यावेळी संतापलेल्या विरोधकांनी “ये अंदर की बात है, भाजप-एमआयएम साथ है’च्या घोषणा दिल्या.

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी गुरुवारी मराठा समाजाने मुंबईत मोर्चा काढला. मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन सभागृहात निवेदन केले. त्यासंदर्भात विरोधकांनी आक्षेप घेत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, असा आग्रह धरला. यावरून बराच गोंघळही झाला. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात येऊन अधिक स्पष्टीकरण केले. त्याचवेळी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. मराठा आरक्षणाबाबत दोन्ही बाजूने आमदार आग्रही असतात. परंतु मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा तीन-चार मुस्लिम आमदार वगळता कोणी लावून धरत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली.
शिवसेना-भाजप बद्दल आम्ही तक्रार करणार नाही. पण ज्यांनी वर्षानुवर्षं मुस्लिमांचा केवळ मतपेटी म्हणून उपयोग केला ते ही याबाबत गप्प राहतात, अशी जोरदार टीका त्यांनी केली. आता या सरकारने तरी मुस्लीम समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. जलील यांच्या प्रखर टीकेमुळे अस्वस्थ झालेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी याला जोरदार आक्षेप घेतला. तर सत्ताधारी सदस्य बाके वाजवून त्यांना प्रोत्साहन देत होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)