कॉंग्रेस, राष्ट्रवादीत जागा वाटपात होणार एकमत ?

निर्णयासाठी पदाधिकाऱ्यांत तातडीची बैठक लवकरच; विरोधी पक्षाचे लक्ष

संतोष गव्हाणे/पुणे: कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात आघाडीचा निर्णय झाला असला तरी लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाटपाबाबतचा प्रश्‍न अद्यापही धुमसत आहे. मुंबई येथे दि. 27 ऑगस्टला झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत यावर साधी चर्चाही झाली नाही. तर, पुणे जिल्ह्यात भोर, इंदापूर यावर कॉंग्रेस दावा सांगत असली तरी या विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचीही मोठी ताकद आहे.

तर, पुरंदर आणि दौंडमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व असताना विशेष म्हणजे शिरूर मतदार संघातूनही लढण्याच्या तयारीत कॉंग्रेस आहे. खेड, मावळ, जुन्नर यासह पुणे शहरांतर्गत मतदार संघात उमेदवार उभे करण्याचीही या दोन्ही पक्षांची तयारी आहे. यामुळेच जागा वाटपावर एकमत करण्याकरिता आता दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक लवकरच होणार आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे महत्त्वपुर्ण बैठक झाली. देशपातळीवर भाजप विरोधात विरोधक एकत्र येत असतानाच राज्यातही भाजपला विरोध करण्याकरिता महत्त्वपुर्ण निर्णय घ्यावे लागतील, याकरिता अन्य पक्षांनाही आघाडीत सामील करून घेण्याबाबत पवार यांनी सूचित केले होते. या पार्श्‍वभुमीवर आघाडीत कॉंग्रेस पक्ष प्रमुख दावेदार असताना आघाडीत अन्य पक्षांची लुडबुड कॉंग्रेस खपवून घेणार का? याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे आणि असे काही छोटे पक्ष आघाडीत समाविष्ट करून घेण्यात आलेच तर लोकसभा आणि विधानसभेच्या कोणत्या जागा कोणाला? यात कॉंग्रेसला किती आणि राष्ट्रवादीला किती? अन्य कोणत्या पक्षाला जागा देणार? असे काही प्रश्‍न मुंबईतील राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर उपस्थित होवू लागले आहेत.

राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाने आघाडी करून लोकसभा 2009 आणि 2014 मध्ये निवडणुका लढविल्या होत्या, त्यावेळी कॉंग्रेसने 26 तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने 22 जागा लढविल्या होत्या; परंतु, आता राजकीय समीकरण बदलले आहे. यातूनच राष्ट्रवादी कॉंग्रेसकडूनही आता निम्म्या-निम्म्या जागांची मागणी पुढे येत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही ही बाब पक्षाध्यक्ष पवार यांच्याकडे लावून धरली आहे. यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडीचा निर्णय झाला असला तरी जागा वाटपात बिघाडी होणार नाही, याची काळजी दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना घ्यावी लागणार आहे.

पुणे जिल्ह्याचा विधानसभेचा विचार करता 21 मतदार संघातील पुणे शहरांतर्गत येणाऱ्या मतदार संघावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी दोघेही दावा सांगत आहेत. तर, अन्य मतदार संघात इंदापूर, भोर आणि पुरंदरच्या जागेबाबत दोन्ही कॉंग्रेसमध्ये कलह होण्याचीच दाट चिन्हे आहेत. मावळ, शिरूर-हवेली, खेड ताब्यात घेण्याकरिता राष्ट्रवादीने तयारी केलेली असताना यातील काही मतदार संघात कॉंग्रेसही शिरकाव करू पाहत आहे, अशा स्थितीत जागा वाटपावर एकमत होणे कठीण मानले जात आहे. परंतु, जागा वाटपातील या दुहीचा फायदा भाजप, शिवसेनेसह अन्य विरोधी पक्षांनी घेवू नये याचीही काळजी दोन्ही कॉंग्रेसला घ्यावी लागणार आहे.

कारण, दौंड सारख्या राष्ट्रवादीच्या मतदार संघात राष्ट्रीय समाज पक्षाने पकड ठेवली आहे तर जुन्नर मध्येही गेल्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने धक्कादायक निकाल दिला आहे. यासह मावळ, शिरूर-हवेली, खडकवासला येथे भारतीय जनता पक्षाने कमळाची मुळे रोवली आहेत, अशी ठोकळ राजकीय स्थिती पाहता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला केवळ आघाडी करून चालणार नाही तर जागा वाटपातही राजकीय स्थिती लक्षात घेत विरोधकांची कोंडी करणारे निर्णय घ्यावे लागणार आहेत. यामुळेच सध्या दोन्ही कॉंग्रेससाठी जागा वाटप, हा कळीचा आणि तेवढाच महत्त्वाचा प्रश्‍न असून यावरच भाजप-शिवसेना पुढील राजकीय चाली खेळणार आहे.

आघाडीचा निर्णय झाला आहे. परंतु, जागा वाटपाबाबत वरिष्ठ पातळीवर अद्याप चर्चा झालेली नाही. बहुतांशी मतदार संघात पक्षाची स्थिती भक्कम आहे. त्यामुळे कोणत्याही पातळीवर लढण्याची पक्षाची तयारी आहे.

– संजय जगताप, पुणे जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस पक्ष


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)