कॉंग्रेसही घेणार लोकसभा मतदारसंघाचा आढावा 

मुंबई: राष्ट्रवादी पाठोपाठ कॉंग्रेसनेही राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. आढावा बैठकीच्या माध्यमातून कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीतील आघाडीसाठी ‘फिफ्टी-फिफ्टी’च्या सूत्राचा आग्रह धरणाऱ्या राष्ट्रवादीवर दबाव वाढवला असल्याचे बोलले जात आहे.

उत्तरप्रदेश, कर्नाटकातील पोटनिवडणुकीने भाजपचा पराभव शक्‍य असल्याचे दाखवून दिले आहे. त्यादृष्टीने आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी समविचारी पक्षाना सोबत घेण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. त्यासाठी भाजपविरोधी राजकीय पक्षांची महाआघाडी उभारण्यात कॉंग्रेसने पुढाकार घेतला आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाच्या जागावाटपाबाबत सध्या दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांची चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादीने जागावाटपासाठी 2014च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा आधार घेतला आहे. लोकसभेला राष्ट्रवादीच्या चार, तर कॉंग्रेसच्या अवघ्या दोन जागा निवडून आल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत फक्त एका जागेचे अंतर होते. कॉंग्रेसचे 42, तर राष्ट्रवादीचे 41 आमदार निवडून आले होते. त्यामुळे आघाडी करताना राष्ट्रवादीने कॉंग्रेसकडे लोकसभेच्या 24 जागांचा आग्रह धरला आहे. मात्र, कॉंग्रेसला राष्ट्रवादीची मागणी मान्य नाही.

गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने 26, तर राष्ट्रवादीने 22 जागा लढवल्या होत्या. यावेळीही ’26 : 22’ हे जागावाटपाचे सूत्र राहील, अशी माहिती कॉंग्रेसच्या एका नेत्याने दिली. राज्यातील कॉंग्रेसचे नेते निम्म्या जागांची मागणी मान्य करत नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे “फिफ्टी-फिफ्टी’चा फॉर्म्युला मांडल्याचे समजते.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. हा आढावा घेताना आघाडीत राष्ट्रवादी आणि इतर मित्र पक्षांना कोणत्या जागा सोडणे शक्‍य आहे याची चाचपणी करण्यात येणार असल्याचे समजते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)