कॉंग्रेसने उघडा पाडला भाजपचा दावा…

कर्नाटकात लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यावरून घमासान
बंगळुरू – कर्नाटकातील कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सिद्धरामैय्या सरकारने तेथील लिंगायत समाजाला वेगळा धर्म म्हणून मान्यता देऊन त्यांना अल्पसंख्याकांच्या सवलती लागू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. पण त्यावरून भारतीय जनता पक्षाने कॉंग्रेसवर हिंदु धर्मियांमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

भाजपचा हा आरोप फेटाळून लावताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनीच मनमोहनसिंग पंतप्रधान असताना त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे ही मागणी केली होती ही बाब निदर्शनाला आणून देऊन भाजपचा दावा कॉंग्रेसने उघडा पाडला आहे. त्यावेळी येडियुप्पा यांनी मनमोहनसिंग यांना पाठवलेल्या निवेदनाच्या प्रतीच कॉंग्रेसने पत्रकारांना सादर केल्या आहेत.

लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याच्या कॉंग्रेसच्या निर्णयावर आक्षेप घेताना भाजपचे नेते सी. टी. रवि यांनी म्हटले आहे की हिंदु धर्मियांमध्ये फूट पाडण्याचा डाव सोनिया गांधींनी आखला असून त्याची पुर्तता कर्नाटकात या निर्णयाद्वारे मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी केली आहे. समाजात फूट पाडून राज्य करण्याचे त्यांचे हे धोरण आहे असा आरोप त्यांनी ट्विटवर केला होता.

त्याला प्रत्युत्तर देताना कॉंग्रेस नेत्यांनी येडियुरप्पा यांनी तत्कालिन पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठवलेल्या निवेदनाची प्रत माध्यमांना सादर केली. त्यात लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता द्यावी अशी मागणी करण्यात आली असून त्या निवेदनावर बी. एस. येडियुरप्पा यांची स्वाक्षरी आहे. हा दावा समोर आल्यानंतर भाजपला बचावात्मक भूमिकेत जावे लागले असून त्यांनी म्हटले आहे की येडियुरप्पा यांनी जेव्हा हे निवेदन पाठवले त्यावेळी ते भाजपच्या बाहेर गेले होते त्यामुळे त्यांच्या त्या वेळच्या या निवेदनाशी भाजपचा संबंध नाही. येडियुरप्पा हे भाजपचे सध्याचे मुख्यमंत्रपदाचे दावेदार असून ते पक्षाचे प्रदेशाध्यक्षही आहेत. कर्नाटकात या विषयावरून निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मोठेच घमासान निर्माण होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)