कॉंग्रेसचे प्रयोग (अग्रलेख) 

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आता सर्वच राजकीय पक्षांच्या निर्णायक हालचालींना सुरुवात झाली आहे. पण कॉंग्रेसकडून मात्र निर्णायक हालचालीऐवजी आता विविध प्रकारचे प्रयोग सुरू झाले आहेत. लोकसभेला आता जेमतेम सात ते आठ महिन्यांचा अवधी बाकी असल्याने त्यांच्याकडे आता प्रयोग करायला वेळ उरलेला नाही पण हे अजून त्यांच्या लक्षात कसे आलेले नाही हे एक कोडेच आहे. वास्तविक नवनिर्वाचित कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांचेच नाव पुढे करण्याचे सर्वानुमते ठरलेले असताना, एक दिवसांच्या अवधीनंतर कॉंग्रेसकडून पंतप्रधानपदासाठी ममता किंवा मायावती यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो अशी बातमी पेरण्यात आली.

मुळात भाजपच्या हातात कॉंग्रेसने स्वत:हून कोलित देणे राजकीय परिपक्‍वपणाचे ठरत नाही. सात-आठ महिने आधीच राहुल गांधी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे करण्यामुळे भाजपच्या टीकेचा सारा रोख त्यांच्यावरच केंद्रित होईल. त्याऐवजी हा रोख अन्यत्र वळवून राहुल गांधी यांचा भाजपच्या प्रखर हल्ल्यापासून काही काळ बचाव करता येईल असा जर विचार कॉंग्रेस करीत असेल तर तोही एक भ्रमच ठरेल. 

थेट कॉंग्रेसच्या गोटातूनच ही बातमी पेरण्यात आली. त्या मागे त्यांचा नेमका काय हेतू आहे यावर वेगवेगळी मतांतरे आहेत. राहुल गांधी यांचे नाव पुढे करून थेट लढाईला सुरुवात करण्याऐवजी नेतृत्वाचा विषय विरोधकांकडे सोपवण्यामागे कॉंग्रेसचे कितीही धुरंधर राजकीय डावपेच असले तरी अशा प्रयोगातून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ब्रॅंड व्हॅल्यू कमी होत आहे हे कॉंग्रेस थिंक टॅंकच्या लक्षात यायला हवे होते. गेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळीही अशाच प्रकारचा एक धांदरट प्रयोग कॉंग्रेसकडून केला गेला होता. त्यावेळी ही निवडणूक नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांच्या नेतृत्वामधील थेट लढाई नाही असे कॉंग्रेसकडून वारंवार सांगितले गेले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला आणि निर्णायकी कॉंग्रेस पार रसातळाला गेली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कॉंग्रेसची त्यावेळची एकूण परिस्थिती लक्षात आल्यामुळे नवख्या राहुल गांधी यांना एकदम थेट पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत उतरवणे दीर्घकालीन राजकारणाच्या दृष्टिकोनातून हानिकारक ठरू शकते, म्हणून त्यांनी हा विचार केला असावा हे एकवेळ पटू शकते. पण त्यानंतर पाच वर्षांचा अनुभव मिळाल्यानंतर निदान आता 2019 च्या निवडणुकीत तरी कॉंग्रेस पक्ष राहुल गांधी यांना मोदींच्या विरोधात पूर्ण ताकदीने मैदानात उतरवेल अशी अपेक्षा होती. पण अजूनही राहुल गांधी यांच्या बाबतीत कॉंग्रेसचे तळ्यात-मळ्यात सुरूच असल्याचे दिसते आहे. स्वत कॉंग्रेसच पंतप्रधानपदासाठी अन्य पक्षांचे नेतृत्व स्वीकारण्यास राजी असेल तर राहुल गांधी यांच्या नावाचा आग्रह समविचारी पक्षांकडून धरला जाण्याची शक्‍यता आपोआपच मावळते.

आतापर्यंत पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी हेच सक्षम उमेदवार आहेत असे म्हणणारे राजदचे नवे नेते तेजस्वी यादव यांनीही त्यामुळे आता भाषा बदलली असून कोणीही सर्वमान्य नेता पंतप्रधानपदाचा दावेदार होऊ शकतो असे आता त्यांनीही सांगायला सुरुवात केली आहे. याच पार्श्‍वभूमीर तिकडे लगेच शरद पवार आणि मायावती यांच्यात दीड तास खलबते झाली. बंगालमध्ये तृणमूलच्या नेत्यांनी पंतप्रधानपदासाठी ममता बॅनर्जी याच कशा योग्य आहेत, हे ओरडून सांगायला सुरुवात केली. या साऱ्या घडामोडींमुळे विरोधकांमध्येच एकवाक्‍यता नाही असे वातावरण निर्माण होऊ लागले असून त्याचा लाभ अर्थातच भाजपला होऊ शकतो. आणि त्यांनी तसा राजकीय लाभ उठवण्यात काहीच गैर नाही. कॉंग्रेसनेच त्यांच्यासाठी ही संधी निर्माण केली आहे. भारतासारख्या मोठ्या देशांतील निवडणुकांमध्ये वातावरणनिर्मिती हा निवडणूक जिंकण्याचा एक मोठा घटक असतो. त्यामुळे वातावरणनिर्मितीत आता भाजपच वरचढ दिसू लागली आहे.

वास्तविक कॉंग्रेससह एकसंध विरोधकांना यावेळी नामी संधी मिळू शकते. त्यासाठी कॉंग्रेसने पुढाकार घेऊन सर्वांची व्यवस्थित मोट बांधण्याची गरज आहे. पण कॉंग्रेसच अजून राहुल गांधी यांना पूर्ण ताकदीने मैदानात उतरवण्यास तयार नाही असे चित्र निर्माण झाले तर कॉंग्रेसला या नामी संधीचा लाभ घेणे दुरापास्त ठरणार आहे. राहुल गांधी हे अजून जेमतेम 48 वर्षांचे आहेत. त्यामुळे दीर्घपल्ल्याचे राजकारण करायचे असेल तर त्यांनी अजून काही काळ थांबलेले उत्तम असा विचार करून कॉंग्रेसचा थिंक टॅंक त्यांच्या बाबतीत अजून काही वेगळा प्रयोग करणार असेल तर ते मात्र त्यांच्या हिताचे असणार नाही हे मात्र नक्‍की. कारण सततचे अपयश किंवा सततच्या आत्मघाती पडत्या भूूमिकेमुळे राहुल गांधी यांच्या एकूणच नेतृत्व क्षमतेविषयी लोकांच्या मनात कायमची शंका निर्माण होईल आणि त्यातून बाहेर येणे त्यांना अशक्‍य होऊन बसेल हे सांगायला कोणा राजकीय तज्ज्ञांची गरज नाही. आता प्रश्‍न असा आहे की, तरीही हे नुकसानकारक प्रयोग कॉंग्रेस अजूनही का करीत आहे?.

नेतृत्वाचा विषय अन्य राजकीय पक्षांकडे सोपवला तर त्यांच्यात नेतृत्वाविषयी एकमत होणार नाही आणि नंतर पुन्हा ही माळ आपोआपच राहुल गांधी यांच्या गळ्यात पडेल असा विचार करून कॉंग्रेसने हा डाव टाकला असेल तर त्यातही काही अर्थ नाही. पण या वादंगामुळे नेतृत्वाविषयी विरोधी गटातच एकवाक्‍यता नाही असे वातावरण निर्माण होण्याचा धोका आहे. त्याचे पद्धतशीर भांडवल भाजपचे लोक करतील. मुळात भाजपच्या हातात कॉंग्रेसने हे स्वत:हून कोलित देणे राजकीय परिपक्‍वपणाचे ठरत नाही. सात-आठ महिने आधीच राहुल गांधी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे करण्यामुळे भाजपच्या टीकेचा सारा रोख त्यांच्यावरच केंद्रित होईल त्याऐवजी हा रोख अन्यत्र वळवून राहुल गांधी यांचा भाजपच्या प्रखर हल्ल्यापासून काही काळ बचाव करता येईल असा जर विचार कॉंग्रेस करीत असेल तर तोही एक भ्रमच ठरेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)