कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा आज नगर जिल्ह्यात

पाथर्डीत दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेळावा
नगर – केंद्र आणि राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांचा आणि अपयशी अशा साडेचार वर्षातील कारभाराचा पंचनामा करण्यासाठी संपूर्ण राज्यात सुरु करण्यात आलेली जनसंघर्ष यात्रा उद्या नगरमध्ये येत असून जिल्ह्यात या यात्रेचे जोरदार स्वागत होणार आहे. या यात्रेत जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन युवानेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.
डॉ.विखे पाटील म्हणाले की, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे गटनेते शरद रणपिसे, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, यांच्यासह महिला व युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह जनसंघर्ष यात्रेत सहभागी झालेल्या मान्यवर नेत्यांचे नाशिक येथून संगमनेरात आगमन होईल. संगमनेर येथे सकाळी 10 वा.आगमन होईल. संगमनेर येथील सभेनंतर दुपारी 12.30 वाजता जनसंघर्ष यात्रेचे लोणी बुद्रूक ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य स्वागत करण्यात येणार असुन, यात्रेच्या स्वागतासाठी लोणी बुद्रूक येथे जय्यत तयारी करण्यात आली असल्याचे डॉ.विखे पाटील यांनी सांगितले.
कोल्हार, राहुरी कारखाना, आणि राहुरी शहरातही कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने यात्रेचे स्वागत करण्यात येणार असुन नगर येथे मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या मैदानावरुन शहरातील रॅलीला सुरुवात होईल. या रॅलीमध्ये शहरातील युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार असुन रॅलीने नगर शहरामय जनसंघर्ष यात्रेचे स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे डॉ.विखे पाटील यांनी सांगितले. भिंगार गावातही यात्रेच्या स्वागत झाल्यानंतर यात्रा पाथर्डीकडे रवाना होईल.
दुष्काळाचे तीव्र सावट दिसुन येत आहे. तरी सरकार अद्यापही कोणताही निर्णय करायला तयार नाही, सरकारची फसलेली कर्जमाफी योजना, इंधनाचे वाढलेले दर, घरगुती गॅसच्या वाढलेल्या किंमती या बरोबरच मागील साडेचार वर्षांत सरकारच्या निर्णयांचा कोणताही लाभ समाजातील घटकांना झालेला नाही, हीच भावना संघर्ष यात्रेतुन व्यक्‍त होताना दिसत असल्याकडे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांनी लक्ष वेधले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)