कॉंग्रेसची कर्नाटकात “धर्म’खेळी

   वर्तमान

   श्रीकांत नारायण

कर्नाटकात लिंगायत समाजाची मोठी संख्या लक्षात घेत सिद्धरामय्या सरकारने लिंगायत समाजाची स्वतंत्र धर्माची मागणी मान्य केली. ‘लिंगायत’ समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याची एका प्रस्तावाद्वारे केंद्र सरकारकडे शिफारस केली. सन 2013 साली केंद्रात डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर असलेल्या संपुआ सरकारने हीच शिफारस फेटाळून लावली होती, हे लक्षात घ्यावे लागेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“कर्नाटक विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच,’ असा पण भाजपबरोबरच कॉंग्रेसनेही केला आहे, असे दिसून येते. सध्या दक्षिण भारतात सत्ता असलेले हे एकमेव राज्य कॉंग्रेसला घालवायचे नाहीये; तर भारत कॉंग्रेसमुक्त करण्यासाठी आसुसलेल्या भाजपला कर्नाटकातील सत्ता हस्तगत करून आपला विजयाचा वारू दक्षिणेतही मिरवायचा आहे. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली असून एकमेकांना शह-काटशह देण्याचे प्रयत्न आतापासूनच सुरू झाले आहेत. त्यातच भाजपला नामोहरम करण्यासाठी कॉंग्रेसने धर्माच्या नावाखाली कर्नाटकात नवी राजकीय खेळी खेळली आहे.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते येडियुरप्पा हे लिंगायत समाजाचे असल्याने आणि भावी मुख्यमंत्री म्हणून भाजपने त्यांच्याच नावाला पसंती दिल्याने, त्यांचा जनाधार कमी करून त्यांची “कोंडी’ करण्यासाठी, कॉंग्रेसने ही खेळी खेळली असल्याचे बोलले जात आहे. कर्नाटकातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 18 टक्‍के लिंगायत समाजाची संख्या आहे. त्यामुळे या समाजाच्या मतदानाला नेहमीच महत्त्व असते. आगामी निवडणुकीत या समाजाची एकगठ्ठा मते मिळण्यासाठी विद्यमान कॉंग्रेस सरकारने हा राजकीय जुगार खेळला आहे. मात्र, त्यामुळे केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ असलेल्या भाजप सरकारची चांगलीच पंचाईत होणार आहे. या प्रस्तावाला मान्यता दिली, तरी त्याचे सारे श्रेय निवडणुकीत कॉंग्रेस घेणार आणि विरोध केला तर कॉंग्रेस निवडणुकीत त्याचे भांडवल करणार आणि कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर असलेला लिंगायत समाज भाजपच्या विरोधात जाणार अशा दुहेरी कात्रीत भाजप सापडला आहे.

वास्तविक लिंगायत समाजाची स्वतंत्र धर्माची मागणी फार जुनी आहे. बाराव्या शतकात कर्नाटकातील एक समाजसुधारक बसवण्णा (संत बसवेश्‍वर) यांनी लिंगायत पंथाची स्थापना केली. अर्थात, हिंदू धर्माच्या “सहिष्णू’ परंपरेनुसार लिंगायत समाजात पुढे चालून अनेक उपपंथ, उपजाती, पोटजाती निर्माण झाल्या. या समाजात 90 हून अधिक उपजाती असल्याची सध्या कागदोपत्री नोंद आहे. वीरशैव लिंगायत समाज हा त्यातीलच एक प्रमुख उपपंथ. कर्नाटकासह महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश आदी राज्यात या समाजाची लक्षणीय लोकसंख्या आहे. हा समाज सध्या इतर मागासवर्गीयांमध्ये मोडतो. त्यामुळे मागास जातींसाठी असलेल्या सवलतींचा या समाजाला फायदा मिळतो. मात्र जर लिंगायत समाजाची स्वतंत्र धर्माची मागणी मान्य झाली तर नियमानुसार “वीरशैव’ समाजाचा “मागास जातीचा दर्जा’ संपुष्टात येऊ शकतो त्यामुळे या समाजाच्या धर्माच्या मागणीला विरोध आहे. त्याचे तीव्र पडसादही कर्नाटकात लगेच उमटले. या मागणीच्या विरोधात वीरशैव समाजातर्फे काही ठिकाणी निदर्शनेही केली त्यामुळे स्वतंत्र धर्माच्या मागणीवरून लिंगायत समाजातच फाटाफूट असल्याचे दिसून आले.

महाराष्ट्रात जसा मराठा जातीचा राजकारणावर प्रभाव आहे, तसाच कर्नाटकातील राजकारणावर लिंगायत समाजाचा फार मोठा प्रभाव आहे. हे लक्षात घेऊनच “वीरशैव’सह लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्याक मानण्याची न्या. नागमोहन दास यांच्या नेतृत्वाखालील समितीने केलेली शिफारस सिद्धरामय्या सरकारने मान्य करून त्याच्या संमतीसाठी पुढील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. अर्थात गेले चार वर्षे सत्तेवर असलेल्या सिद्धरामय्या यांच्या सरकारने या शिफारशीचा निवडणुकीच्या तोंडावरच का स्वीकार केला, याचे सरकारकडे समाधानकारक उत्तर नाही. गेल्या रविवारी लिंगायत समाजातील संतांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेतली आणि दुसऱ्याच दिवशी सरकारने दास समितीच्या शिफारशी स्वीकारून लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याची मागणी मान्यही करून टाकली.

विशेष म्हणजे, या मागणीला काही मंत्र्यांनी विरोध केला होता, अशी माहिती उघड झाली आहे. त्यामुळेच ही मागणी तातडीने मान्य करण्यामागे निव्वळ राजकारण आहे अशीच भावना कर्नाटकातील राजकीय निरीक्षकांचीही झाली आहे. भाजपनेही, “केवळ मतपेटींवर डोळा ठेवून कॉंग्रेसने ही खेळी खेळली असल्याचा,’ आरोप केला आहे. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याच्या मागणीबाबत भाजप नेमकी कोणती भूमिका घेतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून कॉंग्रेसने ही “धर्म’खेळी खेळली असली तरी कदाचित ही राजकीय खेळी कॉंग्रेसवरच बुमरॅंग म्हणून उलटूही शकते. त्यामुळेच हा निर्णय घेऊन कॉंग्रेसने फार मोठा धोका पत्करला आहे, असेच म्हणावे लागेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)