कॉंग्रेसकडे सक्षम उमेदवार नसल्याने पुण्यात राष्ट्रवादीचाच खासदार

हडपसर- भाजप – सेना सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने मित्र पक्ष असलेल्या कॉंग्रेसवर हल्ला करीत, या पक्षाच्या गोटात खळबळ उडवून दिली. पुणे लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीचा हक्‍क सांगत, राष्ट्रवादीचाच खासदार होईल, असे वक्‍तव्य राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज हडपसर येथे पत्रकार परिषदेत केले. पुण्यात लोकसभेसाठी कॉंग्रेसकडे सध्या सक्षम उमेदवार नसल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. राष्ट्रवादीला ही जागा हवी आहे. आणि ही जागा मिळविण्यासाठी काहीही करू आणि राष्ट्रवादीचा खासदार येथे असेल, असा विश्वास पवारांनी व्यक्‍त केला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, खासदार वंदना चव्हाण, अंकुश काकडे, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, राहुल शेवाळे उपस्थित होते.

पवार म्हणाले की, आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे म्हणूनच मी या मतदारसंघावर दावा केल्याचे अजित पवार यांनी आज पुन्हा हडपसर येथे स्पष्ट केले. सत्तेत असताना राष्ट्रवादीने या शहरासाठी खूप काम केली आहेत. आमची ताकद जास्त आहे, त्यामुळे लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार असणार आहे. आघाडी होईल की नाही, हे वरिष्ठ ठरवतील. पण आज मी राष्ट्रवादीचा आहे. त्यामुळे आजचा विचार करणार. आमच्याकडे पुण्यासाठी सक्षम उमेदवार आहेत. उमेदवार असल्याशिवाय मी बोलणार नाही, अशा शब्दांत त्यांनी आगामी राजकीय भूमिका स्पष्ट केली.

सुनील तटकरे म्हणाले की, चौथ्या टप्प्यातील 38 वी सभा आहे. सरकारच्याविरोधात आक्रोश आहे, तरुणाई विरोधात गेली आहे. राज्य सरकारचा दुटप्पीपणा आहे. अनंत गीते उपोषणाला बसले होते. उद्धव ठाकरे यांचा निरोप गेल्यावर त्यांनी उपोषण सोडले, सरकारमध्ये विसंगतपणा आहे. ऑनलाइनच्या रांगेत शेतकऱ्यांना उभा करणाऱ्या सरकारला ऑफलाइन करण्याची गरज आहे. 10 जून रोजी पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत जाहीर सभेने पश्‍चिम महाराष्ट्राच्या हल्लाबोल आंदोलनाची सांगता होणार आहे.

घोडा मैदान दूर नाही
पवार म्हणाले की, बाळा भेगडे, भीमराव तापकीर उपोषणात सॅंडविच खात होते, हे नाटक कशाला करतात. भाजप यूपीए सरकार असताना संसद अधिवेशन बंद पाडण्याचे काम करीत होते. विरोधी पक्षांशी चर्चा घडवून आणली नाही अन्‌ उपोषणाचा देखावा केला. विरोधी पक्षनेते पद कॉंग्रेसला दिले नाही. हा सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव आहे. उपोषणाची नौटंकी सुरू आहे. पुणे शहरात ताकदीचा उमेदवार आहे, पुणे लोकसभा निवडणूक लढविणार असून त्याबाबत आघाडीचे राष्ट्रीय नेते ठरवतील.

बहुमताने विधिमंडळ नेता निवडला जातो. 2019 मध्ये जे आमदार निवडून येतील. त्यावेळी नेता निवडला जाईल. पालकमंत्री सांगतात एक वर्ष राहिले, वास्तविक भाजपमध्ये जेवढे आमदार निवडून आले. त्यात बहुतांश आमदार राष्ट्रवादीचे आहेत, विकासाचे मुद्दे राहत नाहीत. तेव्हा प्राण्यांची नावे घेतली जातात, घोडमैदान दूर नाही कळेल लवकर.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)