कॉंग्रेसकडून भाजपला गोव्यात बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान 

File photo...

विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी 

पणजी: कॉंग्रेसने पुन्हा भाजपला गोव्यात बहुमत सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान दिले आहे. याशिवाय, राज्यपालांनी भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला बहुमत सिद्ध करण्याचा आदेश देत विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणीही केली आहे.

-Ads-

गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मनोहर पर्रीकर काही काळापासून आजारी आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमुळे राज्य सरकारचे कामकाज ठप्प झाल्याचा आरोप कॉंग्रेसने लावून धरला आहे. एवढेच नव्हे तर, राज्य सरकारकडे बहुमत नसल्याचा कॉंग्रेसचा दावा आहे. त्यातून कॉंग्रेसने शनिवारी पुन्हा गोवा विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी राज्यपाल मृदूला सिन्हा यांच्याकडे केली. याबाबत कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीपसिंह सुर्जेवाला यांनी येथे पत्रकारांशी बोलताना भाजपवर टीकास्त्र सोडले.

गोव्यातील घडामोडी म्हणजे भाजप आणि राज्यपालांकडून होणारी जनतेची फसवणूकच आहे. गोव्यात भाजपने राज्यघटनाच ओलीस ठेवली आहे. त्यातून भाजपची सत्तेविषयीची हावच दिसते. आजारी पर्रीकर यांना मुख्यमंत्रिपदावर कायम ठेवल्याने गोव्यात निर्माण झालेल्या राजकीय आणि प्रशासकीय गोंधळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हेच जबाबदार आहेत. गोव्याचा मुद्दा आम्ही आगामी हिवाळी अधिवेशनात संसदेत आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापुढे मांडू. गोव्यात विशेष अधिवेशन बोलावण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर दबाव टाकला जाईल, असे सुर्जेवाला यांनी म्हटले.

भाजपच्या मित्रपक्षाने केली मुख्यमंत्रिपदाची मागणी 
पर्रीकर आजारी असल्याने गोव्याचे मुख्यमंत्रिपद आमचे नेते सुदीन ढवळीकर यांच्याकडे सोपवले जावे, अशी मागणी भाजपचा मित्रपक्ष महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगोप) केली आहे. संबंधित मागणी पूर्ण न झाल्यास आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुका भाजपच्या विरोधात लढण्याचा इशाराही मगोपने दिला आहे. ढवळीकर हे पर्रीकर यांच्यानंतरचे गोवा मंत्रिमंडळातील सर्वांत ज्येष्ठ मंत्री आहेत. पर्रीकर यांच्या आजारपणामुळे मागील आठ महिन्यांपासून गोव्याचे प्रशासन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे सांगत मगोपने आक्रमक भूमिका स्वीकारली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)