केस विंचरून दाखवाच!

काळेभोर, मऊ केस हे कोणाही तरुणीच्या अथवा महिलेच्या सौंदर्याला चार चॉंद लावतात. असा केशसंभार मिळवण्यासाठी किती सायास केले जातात हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आजकाल तर हेअर ट्रिटमेंटच्या नावाखाली भरमसाठ खर्च करण्याची फॅशनच आली आहे. अशा तरुणींना “एवढ्या पैशात नवीन डोकं आलं असतं’ अशी उपहासात्मक टिप्पणी हमखास ऐकावी लागते. पण तरीही विविध प्रकारच्या प्रक्रिया त्या केसांवर करत राहतात. अलीकडील काळात तर स्ट्रेटनिंग करून घेण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. मात्र स्ट्रेटनिंग न करताही एका मुलीचे केस ‘स्ट्रेट’ राहताहेत…आणि तेही कायमचे!

ऐकून आश्‍चर्य वाटलं असेल ना! पण ऑस्ट्रेलियातील एका चिमुरडीच्या केसांबाबत हे घडलं आहे. भल्या भल्यांनी तिचे केस विंचरून जागच्या जागी स्थानापन्न करण्याचा आटोकाट प्रयत्न करून पाहिला, पण तिचे केस उभेच! सात वर्षांच्या या शिलाह जयन नावाच्या मुलीच्या डोक्‍यावर कंगवा फिरवणे ही कठीण बाब आहे. एका दुर्मिळ विकारामुळे तिचे केस असे बनले आहेत. असा विकार जगभरातील केवळ शंभर लोकांना आहे व त्यापैकीच ही मुलगीही आहे. “अनकॉम्बिकल हेअर सिंड्रोम’ असे या विकाराचे नाव. त्यामध्ये केस असामान्य गतीने वाढतात आणि डोक्‍याच्या त्वचेमधून ते अनियंत्रितपणे वाढतच जातात. त्यामुळे ते नेहमी खडेच असतात व ते विंचरता येणे कठीण जाते.

ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न शहरात राहणाऱ्या या मुलीचे केस जन्मतःच असे नव्हते. ती तीन महिन्यांची होती त्यावेळी तिच्या डोक्‍यावर स्ट्रॉबेरीच्या रंगाचा एक चट्टा दिसून आला. त्यानंतर तिचे केस असे सरळ उभे येऊ लागले. ती चार वर्षांची झाली त्यावेळी तिच्या आईवडिलांनी याबाबत गांभीऱ्याने विचार करणे सुरू केले. शिलाहला आता त्यांनी तू “स्पेशल’ असल्याने तुझे केस असे आहेत असे सांगितले आहे. त्यामुळेच शिलाहलाही आपली ही “हेअरस्टाईल’ मनापासून आवडते!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)