आजच्या काळात पाणीप्रदूषण, हवा प्रदूषण आणि अन्नातील पोषक घटकांचा अभाव यांमुळे त्वचेवर प्रतिकूल परिणाम होत आहेत. केसांचे आरोग्यही यामुळे बाधित होत चालले आहे. विशेषतः टक्कल पडण्याची समस्या तर हल्ली अनेकांना भेडसावते. अनुपम खेरसारखा एखादा व्यक्ती आपले टक्कल सेलीब्रेट करत असला तरी अन्यांना मात्र टक्कल पडू लागले की काळजी वाटू लागते.
विशेषतः नवतरुण आणि त्यातही अविवाहित तरुणांसाठी तर केसगळती ही चिंताक्रांत करते. कारण लग्नाच्या बाजारात टक्कल असलेल्यांना बहुतांश वेळा नाकारलं जातं, असा एक समज आहे. त्यामुळेच आज हेअर ट्रान्सप्लांट करून घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अर्थातच केस हे आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये महत्त्वाचा घटक आहे. लांबसडक केस हे स्त्रीसौंदऱ्याचे एक लक्षण मानले जाते.
अनेक स्त्रिया आपले केस वाढावेत, यासाठी अनेक प्रकार करीत असतात. त्यासाठी त्यांना अनेक जाहिरातीही भुरळ घालत असतात; पण केस काही लांब होत नाहीत. रशियातील एका तरुणीने मात्र सहज ठरवले आणि तिचे केस चांगले सहा फूट लांब झाले! डेरिया गुबानोव्हा असे या 27 वर्षांच्या तरुणीचे नाव आहे. तिने काही वर्षांपूर्वी आपल्या मैत्रिणीशी पैज लावली आणि त्यानंतर तिने केसांना कात्री लावली नाही.
निव्वळ गंमतीपोटी केलेल्या प्रकारामुळे तिचे केस मात्र भरमसाठ वाढले. ती तेरा वर्षांची होती त्यावेळी तिचे केस छोटे होते. त्यावेळी केस बांधण्याइतकेही तुझे केस लांब नाहीत, असे तिच्या एका मैत्रिणीने म्हटल्यावर तिने माझे केस पावलांपर्यंत पोहोचण्याइतके लांब करीन, अशी पैज तिने लावली. आता खरोखरच तिचे केस पावलांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. तिच्या या लांबसडक केसांमुळे ती सोशल मीडियातही लोकप्रिय आहे. तिने आपल्या केसांचे सहाशेपेक्षाही अधिक फोटो शेअर केले आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा