केवळ 215 संस्थांकडून बिंदूनामावली नोंद

शिक्षक भरती : 17 डिसेंबरपर्यंत पुन्हा मुदतवाढ

पुणे – राज्य शासनाने प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी कार्यन्वित केलेल्या पवित्र पोर्टलवर आतापर्यंत केवळ 215 शैक्षणिक संस्थांनीच बिंदूनामावलीची नोंदणी केली आहे. पोर्टलवर बिंदूनामावलीची नोंदणी करण्यासाठी संस्थांकडून पुरेसा प्रतिसादच मिळत नसल्याने शासनाने आता नोंदणीसाठी चौथ्यांदा 17 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शासकीय व खासगी शैक्षणिक संस्थेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टल विकसित केले आहे. यावर उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एकूण 1 लाख 78 हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. उमेदवारांनंतर शैक्षणिक संस्थांना बिंदूनामावली नोंदणी करण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. यासाठी 3 ते 19 ऑक्‍टोबर या कालावधीत देण्यात आलेल्या मुदतीत केवळ 12 संस्थांनीच नोंदणी केली आहे. यानंतर शासनाकडून नोंदणीसाठी 31 ऑक्‍टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतवाढीत नोंदणी केलेल्या संस्थांची संख्या 114 पर्यंत पोहोचली.

शैक्षणिक संस्थांकडून बिंदूनामावली नोंदणीसाठी प्रतिसाद मिळत नसल्याने शासनाकडून पुन्हा 15 नोव्हेंबरपर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ दिली होती. या मुदतवाढीत केवळ 215 संस्थांनीच नोंदणी केली आहे. संस्थांकडून आणखी नोंदणीसाठी प्रतिसाद मिळावा यासाठी आता चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. येत्या 17 डिसेंबरपर्यंत नोंदणीसाठी डेडलाईन देण्यात आली आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी राजेश शिंदे यांनी दिली.

राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचे प्रकरण सध्या चालू आहे. या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळांना बिंदूनामावलीची नोंदणी पूर्ण करता येणार नाही. खासगी शैक्षणिक संस्थांनी पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करण्याला तीव्र विरोध करत न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयातून निर्णय होईपर्यंत या खासगी संस्था नोंदणी करणार नाहीत, हे उघडच आहे. शासकीय व खासगी अशा सर्वच शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांची एकूण 20 हजार पदे रिक्त आहेत. बिंदूनामावली नोंदणीसाठी संस्थांकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याने शिक्षक भरती ही आणखी लांबणीवरच पडण्याची चिन्हे आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)