केवळ कसोटीत खेळणे सोपे नाही: रवींद्र जडेजा 

लंडन: कोणत्याही खेळाडूला केवळ कसोटी सामने खेळत राहणे हे निश्‍चितच सोपे नसते. आपल्या कामगिरीत सातत्याने सुधारणा हवी असेल, तर तुम्ही क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळले पाहिजे, असे मत भारताचा फिरकी गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने व्यक्‍त केले. पाचव्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यावर तो बोलत होता.
भारत व इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी संघात स्थान मिळालेल्या रवींद्र जडेजाने पहिल्या दिवशी मोक्‍याच्या क्षणी इंग्लंडच्या दोन फलंदाजांना बाद करुन भारतीय संघाच्या पुनरागमनात मोलाचा वाटा उचलला. जडेजाने सांगितले की, केवळ कसोटी क्रिकेटमध्ये खेळणे हे तुमच्या कामगिरीच्या दृष्टीने हितकारक नसते. आपल्या कामगिरीत सातत्य हवे असेल तर तुम्ही खेळाच्या तिन्ही प्रकारात खेळायला हवे. माझ्या बाबतीत बोलायचे झाल्यास मी मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करतो. सध्या मी भारतीय संघाकडून खेळतो आहे, हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मात्र, मी या खेळाच्या तिन्ही प्रकारात लवकरच पुनरागमन करेन असा मला विश्‍वास आहे.
सामन्यातील एकमेव फिरकी गोलंदाज म्हणून भारतीय संघात स्थान देण्यात आल्याचा दावा खोडुन काढताना जडेजाने सांगितले की, मी एक अष्टपैलू खेळाडू आहे. मिळालेल्या संधीतून मी ते सर्वांना दाखवून देईन. त्याचबरोबर भविष्यात एक पूर्णवेळ अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात माझे स्थान पक्‍के करेन, याचा मला विश्‍वास आहे. ज्या ज्या वेळी मला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली, तेव्हा तेव्हा मी फलंदाजी आणि गोलंदाजीत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला.
जडेजा पुढे म्हणाला की, ज्यावेळी तुम्ही तुमच्या कारकिर्दीतील खराब काळातून जात असता, तेव्हा तुम्हाला पुन्हा तुमची कामगिरी सुधारण्यासाठी मिळतील तेवढ्या संधीचा फायदा घेतला पाहिजे.
त्यामुळे मी जेवढे सामने खेळेन, तेवढी माझ्या कामगिरीत सुधारणा होत जाईल अशी मला खात्री आहे. भारतीय संघाने पहिल्या दिवसातील अखेरच्या सत्रात जोरदार पुनरागमन करताना 65 धावांत सहा गडी बाद केल्याने भारताला दिवस अखेर इंग्लंडला 200 धावांच्या वेशीवर रोखता आले. जडेजा म्हणाला की, खेळपट्टीमधून गोलंदाजांना कोणत्याही प्रकारचे साहाय्य मिळत नव्हते. त्यामुळे आम्ही विशिष्ट टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचाच आम्हाला या सत्रात फायदा झाला. आमच्या वेगवान गोलंदाजांनी केलेल्या तिखट माऱ्यामुळेही आम्हाला इंग्लंडवर दडपण राखता आले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)