केळघर घाटात ठिकठिकाणी मृत्यूचे सापळे

केळघर ः संरक्षक कठडे ठिकठिकाणी तुटल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. (छाया ः कमलाकर शेटे)

प्रशासनाचे दुर्लक्ष देते अपघाताला निमंत्रण
मेढा, दि. 26 (प्रतिनिधी) – पश्‍चिम जावळीतील केळघर घाट धोकादायक झाला आहे.सार्वजनिक बांधकाम खात्याच्या प्रशासनाचे दुर्लक्ष गंभीर अपघाताला निमंत्रण देऊ शकते. या मार्गावर तातडीने ठोस उपाययोजनांची करण्याची आवश्‍यकता आहे.

मेढामार्गे महाबळेश्वरला जाण्यासाठी नेहमी जाणारे चाकरमानी, कोकणवाशी तसेच कामगार व मोलमजूरी करणारे शेकडो हात याच केळघर घाटाला अधिक पसंती देतात. मात्र, याच केळघर घाटात पावसानंतर आज एवढी धोकादायक परिस्थिती झाली आहे की प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाला जीव मुठीत घेवून जावे लागत आहे. नेहमी जा- ये करणारांना धोका कोठे आहे, कोठे थांबू नये, कोठून प्रवास तातडीने करावा, असे बारकावे माहीत असल्याने ते सुसाट निघून जातात. मात्र, पर्यटन आणि मौजमजा करण्यासाठी येणारी मंडळी मात्र घाट रस्त्यात झाडाखाली दरडीलगत गाड्या लावून निसर्गाचा आनंद घेतात.मात्र, कधी काय घडेल याचा नेम नाही.
जिथे धोकादायक ठिकाणे आहेत तिथे सूचना फलक लावणे,जीर्ण फलक बदलणे गरजेचे आहे. तब्बल 18 किलोमीटरच्या घाटात अति तीव्र धोकादायक ठिकाणे 18 पेक्षा अधिक आहेत. रस्ता काही ठिकाणी कडेला खचलेला आहे. अनेक ठिकाणी संरक्षण कठडे अपघातात तुटलेले आहेत. त्यामुळेही अपघाताला निमंत्रण मिळत आहे. रस्ते अरुंद व साइडपट्टी खराब अशी विचित्र अवस्था आहे. त्यामुळे वाहन चालविताना मोठी कसरत होते . घाटात काळाकडा या नावाने प्रसिध्द असलेले अपघात ठिकाण आता मृत्यूचा सापळाच झालेले आहे. या ठिकाणी मोठा दगड रस्त्यातच पडलेला आहे. या दगडामुळे या ठिकाणी एकेरी वाहतूक होते. विशेष म्हणजे प्रशासनाला सहा महिने झाले हा दगडच हालविता आला नाही. या परिसरात तर कधी दरडी व दगडे कोसळतील हे सांगणे अशक्‍य आहे. ही काळजी प्रशासनाने या पूर्वीच घेतली पाहिजे होती. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष झालेले आहे.केळघर घाटातील ही कामे तातडीने होणे आवश्‍यक आहे. प्रवासी संख्या मोठी आहे. अंबेनळी सारखी दुर्घटना घडण्यापूर्वीच काळजी घेतली तर सर्वांसाठीच सुरक्षितता ठरेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)