केट्‌स पॉईंटवरील अतिक्रमण वनविभागाने हटवले

महाबळेश्वर, दि. 10 (प्रतिनिधी) – महाबळेश्वरमधील केट्‌स पॉईंटवरील इब्राहिम बाबाजी डोंगरे यांचे परवानाधारक क्षेत्रापेक्षा व्यवसायासाठी वाढीव वनक्षेत्रावरील अतिक्रमण वनविभागाने अचानक मोहिम राबवून जेसीबीच्या साह्याने हटवले व तेथील साहित्य जप्त केले. या मोहिमेत वनक्षेत्रपाल रणजित गायकवाड, सातारच्या फि. प. चे संदीप गवारे, वनपाल सुनील लांडगे, संभाजी नाईक सुनील भोसले यांच्यासह वनकर्मचाऱ्यांचा या अतिक्रमण मोहिमेमध्ये सहभाग होता.

महाबळेश्वरमधील विविध प्रेक्षणीय स्थळावर वनविभागाच्यावतीने काही निकषांच्या आधारे व्यवसायासाठी स्टॉल लावण्यास अधिकृत परवानगी देण्यात येतात. मात्र, येथील केट्‌स पॉईंट या प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळावर इब्राहिम बाबाजी डोंगरे हे गेली अनेकवर्षे व्यवसाय करीत आहेत. वनविभागाने त्यांना दहा बाय पंधरा फूट जागा स्टॉल लावण्यास अधिकृत परवानगी दिली होती मात्र डोंगरे हे व्यवसायासाठी वाढीव वनक्षेत्राचा वापर करीत असल्याचे वनखात्याच्या निदर्शनास आले होते. याआधी देखील वनविभागाच्या वतीने येथील अतिक्रमण हटविण्यात आले होते. त्याच ठिकाणी पुन्हा अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वनविभागाने भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1) डी. एच. 26 (1अ) अन्वये बुधवारी सकाळी वनक्षेत्रपाल रणजित गायकवाड, सातारच्या फि.प चे संदीप गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटाव मोहिम राबवली. इब्राहिम डोंगरे यांचे केट्‌स पॉईंट येथील वाढीव अतिक्रमण जेएसीबीच्या साहाय्याने हटवून तेथील खुर्च्या,टेबल, लोखंडी पाइप आदी साहित्य जप्त करण्यात आले. कारवाईमध्ये वनक्षेत्रपाल रणजित गायकवाड, सातारच्या फि. प. चे संदीप गवारे, वनपाल सुनील लांडगे, संभाजी नाईक सुनील भोसले यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. मोहिमेला महाबळेश्वर नगरपालिकेनेदेखील सहकार्य केले. यापुढे अतिक्रमण करणाऱ्यांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल रणजीत गायकवाड यांनी दिली.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)