केंद्र सरकार शेतकऱ्यांना देणार मोठा दिलासा

वेगवेगळ्या प्रस्तावावर चर्चा : 15 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

नवी दिल्ली: कॉंग्रेसशासित तीन राज्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारसुद्धा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची तयारी करीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यासंदर्भात नरेंद्र मोदी यांनी अर्थमंत्री अरुण जेटली आणि कृषिमंत्री राधामोहन सिंग यांच्याशी बुधवारी चर्चा केली असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशभरातील शेतकरी केंद्रातील मोदी सरकारवर प्रचंड नाराज आहे. अशातच, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या कॉंग्रेसशासित तीन राज्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली. यामुळे भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

देशभरातील शेतकऱ्यांची नाराजी लोकसभेच्या निवडणुकीत भारी पडू शकते, याची जाणीव केंद्र सरकारला झाली आहे. यामुळे निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची तयारी करीत आहे.

कृषी कर्जाचे हप्ते बरोबर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जावरील व्याज माफी मिळू शकते. यावर 15 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याशिवाय पिकांच्या विम्याचे प्रिमियमसुद्धा पूर्णपणे माफ होण्याची शक्‍यता आहे. सध्या सरकार वेगवेगळ्या प्रस्तावावर चर्चा करीत आहे.

महत्त्वाचे म्हणजे, तेलंगणा सरकारच्या धर्तीवर डायरेक्‍ट बेनिफिट ट्रान्सफर योजना राबविण्याचाही सरकारचा विचार आहे. बियाणे, खते, कीटकनाशक आणि मजुरी यासारख्या बाबींवर येणारा खर्च थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा विचार आहे. नीती आयोगानेसुद्धा आपला प्रस्ताव सरकारकडे सादर केला आहे. उत्पन्न मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर पिकांचे दर समर्थन मूल्यांपेक्षा कमी होत असेल तर उर्वरित रक्‍कम सबसिडीच्या रूपात देण्याचाही सरकारचा विचार आहे.

केंद्र सरकारने या सर्व योजनांची अंमलबजावणी केली तर 1.3 लाख कोटी रुपयांचा बोजा खजिन्यावर पडणार आहे. हा खर्च 70:30 च्या स्वरूपात केंद्र आणि राज्याकडून उचलला जावा, असा प्रस्ताव आहे. लोकसभेच्या तोंडावर हा निर्णय घेतला जाणार असल्यामुळे भाजपविरोधी पक्षांच्या सरकारकडून यास पाठिंबा मिळणे थोडे अवघड जाईल. मात्र, त्यांना पूर्णपणे विरोधात जाणे परवडणारे नसेल. शिवाय, भाजपशासित राज्ये यास राजी होतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)