केंद्र सरकारविरूद्ध अण्णांचा एल्गार…

आंदोलन दाबण्याचा प्रयत्न
केंद्र सरकार आंदोलनात दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी केला. दिल्लीच्या शेजारी राज्यांतून अनेक स्वयंसेवक आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले आहेत. परंतु, त्यांच्या गाड्यांना अडविले जात आहे. सरकारने आंदोलन दाबण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होईल, असेही अण्णा म्हणाले.

रामलीला मैदानावर उपोषण सुरू
नवी दिल्ली – लोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा रामलीला मैदानावर आजपासून उपोषणास सुरूवात केली आहे. लोकपालची नेमणूक, कृषी मूल्य आयोगाला घटनात्मक दर्जा, निवडणूक सुधारणा आणि 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन या प्रमुख चार मागण्या घेवून अण्णा उपोषणावर बसले आहेत.

शहीद-ए-आझम भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांचा आज शहीद दिन असून अण्णांनी आजपासून रामलीला मैदानावर केंद्र सरकारविरूध्द आंदोलन सुरू केले. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी हजारो नागरिकांनी मैदानावर हजेरी लावली. अण्णांनी यापूर्वी 2011 मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारविरूद्ध रामलीला मैदानावर आंदोलन सुरू केले होते. लोकपाल विधेयक 1966 पासून आठ वेळा संसदेत आले. परंतु, पारीत होवू शकले नाही. हे विधेयक पारीत करावे म्हणून अण्णांनी आंदोलन करून कॉग्रेसप्रणित संपुआ सरकारवर दबाव निर्माण केला होता.

आता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने लोकपाल कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी आंदोलन केले आहे. दोन्ही आंदोलन विद्यमान सरकारविरूध्द करावे लागले हे येथे विशेष. अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी केंद्र सरकारकडून बरेच प्रयत्न झाले. परंतु, अण्णा आपल्या निर्णयावर ठाम राहत आजपासून आंदोलनास सुरवात केली.

दरम्यान, रामलीला मैदानातील वातावरण भारतमय झाले आहे. केंद्र सरकारकडून सुध्दा सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. “भारत माता की जय’ आणि “अण्णा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’ अशा घोषणांनी मैदान दणाणून सोडले आहे. आंदोलनात आजच्या गर्दीत दिल्लीपेक्षा हरयाणा, पंजाब, राजस्थान आणि शेजारी राज्यांची लोक जास्त होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)