केंद्र, राज्य शासनाच्या अकार्यक्षम कारभारामुळे जनता त्रस्त

खासदार अशोक चव्हाण : सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी जनसंघर्ष यात्रा

पुणे – केंद्र आणि राज्य शासनाच्या अकार्यक्षम कारभारामुळे देश आणि राज्यातील जनता त्रस्त झाली आहे. नोटाबंदी, जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्थाच ढासळली आहे. बिघडलेल्या सामाजिक सलोख्यामुळे दलित आणि अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत. या कारभाराला केंद्र आणि राज्य शासनाचे धोरणच कारणीभूत आहे, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला. त्यामुळेच सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठीच या जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा पुण्यात दाखल झाली, त्यावेळी आयोजित जाहीर सभेत बोलताना खासदार चव्हाण यांनी हा आरोप केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ. विश्‍वजित कदम, आमदार शरद रणपिसे, अनंतराव गाडगीळ, अमर राजुरकर, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, दिप्ती चवधरी, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सोनाली मारणे, डॉ. रोहित टिळक, महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आदी उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे, असा आरोप करून चव्हाण म्हणाले, बेरोजगारीचा प्रश्‍न सोडविणे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात या सरकारला साफ अपयश आले आहे. त्याशिवाय, विचारवंतावर वारंवार होणारे हल्ले ही चिंताजनक बाब आहे. सरकारच्या या धोरणामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळेच जनतेच्या हितासाठी कॉंग्रेसच्या वतीने ही जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून सर्वसामान्य नागरिकांच्या पाठिंब्यावर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जिंकणारच असा दावाही चव्हाण यांनी केला. देशात आणि राज्यात सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष असून त्याचे रुपातंर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही, असा दावा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला.

पुणेकरांकडून स्वागत; पुष्पवृष्टी 
कात्रज येथे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जनसंघर्ष यात्रा पुढे अप्पर इंदिरानगर शनि मंदीर, तीन हत्ती चौक, तळजाई झोपडपट्टी, अरण्येश्वर मंदिर, राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल, सारसबाग, दांडेकर पूल, दत्तवाडी, मांगीरबाबा चौक, निलायम टॉकीज चौक, वसंतदादा पाटील पुतळा, नातू बाग, आप्पा बळवंत चौक, शनिवारवाडा, केसरीवाडा येथे पोहोचली. त्यानंतर बालगंधर्व रंगमंदीर, तुकाराम पादुका चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक, वडारवाडी चौक, दीप बंगला चौक, गोखले नगर, चतु:श्रृंगी परिसरात पोहोचली. या सर्व ठिकाणी पुणेकरांनी जनसंघर्ष यात्रेचे भव्य स्वागत केले. पर्वती विधानसभा मतदारसंघात नागरिकांनी पुष्पवृष्टी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)