केंद्रीय मंत्री गोहेन यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल?

गुवाहाटी – केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते राजेन गोहेन यांच्याविरोधात आसाममध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र, त्याबाबत वेगवेगळी माहिती देण्यात येत आहे. दरम्यान, गोहेन यांनी बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेच्या विरोधात ब्लॅकमेलिंगची तक्रार दिली आहे.

बलात्काराच्या गुन्ह्याबाबतचे वृत्त पुढे आल्यानंतर पीटीआयने गोहेन यांच्याशी मोबाईल फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. स्वत: गोहेन फोनवर बोलले नाहीत. त्यांच्याऐवजी त्यांचे ओएसडी संजीव गोस्वामी पीटीआयच्या प्रतिनिधीशी बोलले. गोहेन यांच्याविरोधातील गुन्हा मागे घेण्यात आला असल्याचा दावा त्यांनी केला. पोलिसांनीही गोहेन यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने गुन्हा मागे घेण्याची विनंती न्यायालयाला केल्याचे नमूद केले.

अर्थात, काही कारणावरून गुन्हा मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. तो अजूनही दाखल आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. गोहेन यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी 24 वर्षीय महिला विवाहित आहे. ते एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखतात.

संबंधित महिलेने बलात्काराची घटना सात ते आठ महिन्यांपूर्वी घडल्याचे तक्रारीत म्हटले होते. गोहेन लोकसभेत आसाममधील नौगांव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते राज्यमंत्री म्हणून रेल्वे खात्याची जबाबदारी सांभाळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)