केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन 

फुफुसाच्या कर्करोगावरील उपचारादरम्यान रुग्णालयातच अखेरचा श्‍वास 

भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या वर्तुळात कायमच 
अनंत कुमार हे दीर्घकाळापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते. लोकाभिमुख राजकारणी आणि व्यासंगी नेता म्हणून त्यांची ओळख होती. संघाचे सर्वसामान्य स्वयंसेवक पासून ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंतचा प्रवास वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षापर्यंत त्यांनी केला. त्यांनी 1987 साली भाजपमधून सक्रिय राजकारणाला सुरुवात केली. कर्नाटक भाजपमधील विविध पदांच्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर त्यांनी अल्पावधीतच राष्ट्रीय राजकारणामध्ये आपले स्थान निर्माण केले. कर्नाटकात भाजपची वाढ करण्यामध्ये आणि 2008 मध्ये कर्नाटकात भाजपचे सरकार स्थापन करण्यात बी.एस.येडियुरप्पा यांच्यासह अनंत कुमार यांचाही मोठा वाटा होता. ते सर्वप्रथम 1996 साली दक्षिण बेंगळूरुमधून लोकसभेवर निवडून गेले. अखेरपर्यंत त्यांनी याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 1998 साली अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातील ते सर्वात तरुण मंत्री होते. अटलबिहारी वाजपेयींपासून नरेंद्र मोदी यांच्या सरकारपर्यंत भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या वर्तुळात त्यांचा नेहमीच सहभाग असायचा. 

बेंगळूरु: केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अनंत कुमार यांचे आज पहाटेच्या सुमारास फुफुसाच्या कर्करोगामुळे निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. अनंत कुमार यांच्यावर दीर्घकाळापासून कर्करोगाचे उपचार सुरू होते. ऑक्‍टोबर महिन्यात ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये त्यांच्यावर उपचार झाले होते.
रात्री 2 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी त्यांची पत्नी तेजस्विनी आणि दोन कन्या त्यांच्या जवळ होत्या. असे शंकर कॅन्सर फौंडेशनचे अध्यक्ष बी.आर. नागराज यांनी सांगितले.

दक्षिण बेंगळूरुमधील खासदार असलेल्या अनंत कुमार यांना कर्करोगाबरोबरच जंतूंचा प्रादुर्भावही झाला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांना अतिदक्षता विभागामध्ये कृत्रिम श्‍वासोच्छवास देण्यात येत होता. अनंत कुमार यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार केले जातील, असे भाजपच्या कर्नाटकातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अनंत कुमार यांच्या निधनामुळे कर्नाटक सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि देशभरातील राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अनंत कुमार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्‍त केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)