केंद्रात सत्ता मिळाल्यास नोटाबंदीची चौकशी

भाजपने मागावी माफी
दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांचा आक्रमक पवित्रा

नवी दिल्ली: नोटाबंदीच्या घोषणेला गुरुवारी दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर विरोधकांनी आक्रमक पवित्रा स्वीकारत मोदी सरकार आणि भाजपवर टीकेची झोड उठवली. कॉंग्रेसने शुक्रवारी देशभरात निदर्शने करून नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध केला. याशिवाय, केंद्रात सत्ता मिळाल्यास नोटाबंदीच्या घोटाळ्याची चौकशी करण्यात येईल, असे कॉंग्रेसने जाहीर केले. तर नोटाबंदीच्या माध्यमातून गरिबांना यातना दिल्याबद्दल भाजपने माफी मागावी, अशी मागणी सप आणि बसप या पक्षांनी केली.

गांधी परिवाराचा चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा नष्ट
काळ्या पैशांना आळा घालण्यासाठी मोदी सरकार कार्यरत आहे. तर कॉंग्रेस अध्यक्ष तो वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत आहे. तर गांधी परिवार मागे राहिला आहे. नोटाबंदीमुळे गांधी परिवाराच्या चार पिढ्यांनी चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा नष्ट झाला. त्या निर्णयामुळे कर भरणाऱ्यांची संख्या वाढली, असे भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले.

सूट-बूटवाल्यांनाच मोदींकडून मदत – राहुल गांधी
परदेशांतून काळा पैसा परत आणण्याचे आश्‍वासन पूर्ण न करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेची फसवणूक केली आहे. सामान्य जनतेऐवजी मोदी सूट-बूटवाल्या मित्रांना मदत करत आहेत. नोटाबंदीचा निर्णय लागू झाल्याच्या दोन वर्षांनंतर बेरोजगारीत वाढ झाली आहे. नोटाबंदी म्हणजे सूट-बूटवाल्या मित्रांच्या काळ्या पैशांचे रूपांतर पांढऱ्या पैशांत करण्यासाठीचे नियोजित कारस्थान होते, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एकीकडे नोटाबंदीचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेसने देशाची राजधानी दिल्ली आणि राज्यांच्या राजधानींच्या शहरांमध्ये भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या (आरबीआय) कार्यालयांसमोर निदर्शने केली. तर दुसरीकडे नोटाबंदीच्या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधकामंध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगले. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारीच नोटाबंदीच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले. नोटाबंदीमुळे कर भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. याशिवाय, वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था हे बिरूद देशाने सलग पाचव्या वर्षी मिळवले, असे जेटली यांनी म्हटले. तर मोदी सरकारच्या प्रत्येक भ्रष्टाचारविरोधी पाऊलाविरोधात कॉंग्रेस पक्ष निदर्शने का करतो, असा सवाल भाजपकडून विचारण्यात आला. दरम्यान, कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी भोपाळमधील पत्रकार परिषदेत नोटाबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारवर निशाणा साधला.

नोटाबंदी म्हणजे मोदीनिर्मित आपत्ती आहे. नोटाबंदी हा स्वतंत्र भारतातील सर्वांत मोठा घोटाळा आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नोटाबंदीपूर्वी देशभरात मोठ्या प्रमाणात मालमत्तांची खरेदी केली. अशाप्रकारच्या बिहारमधील 8 आणि ओडिशामधील 18 मालमत्तांची यादी कॉंग्रेसने आधीच जाहीर केली आहे. नोटाबंदीच्या निर्णयाची माहिती भाजप आणि संघाला आधीच होती का याची चौकशी व्हायला हवी. नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला त्यादिवशी भाजपच्या कोलकाता शाखेने बॅंक खात्यात जुन्या नोटांच्या स्वरूपात 3 कोटी रूपये जमा केले.

भाजपशासित राज्यांमधील सहकारी बॅंकांमध्ये नोटाबंदीच्या काळात 14 हजार 293 कोटी रूपये जमा करण्यात आले. ती रक्कम देशभरातील सहकारी बॅंकांमध्ये जमा करण्यात आलेल्या रकमेच्या 65 टक्के इतकी आहे. अशाप्रकारच्या सर्व बाबींची चौकशी व्हायला हवी. कॉंग्रेसला केंद्रात सत्ता मिळाल्यास नोटाबंदी आणि आताच्या सरकारने केलेल्या इतर सर्व घोटाळ्यांची चौकशी केली जाईल, असे सुर्जेवाला यांनी म्हटले. सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लखनौमध्ये पत्रकारांशी बोलताना नोटाबंदीच्या निर्णयावर टीकास्त्र सोडले. नोटाबंदीमुळे व्यवसायांना फटका बसला आणि बेरोजगारी वाढली. त्या निर्णयाचा कुणाला लाभ झाला, या उत्तराच्या प्रतीक्षेत अजूनही जनता आहे. नोटाबंदीला सरकार यशस्वी मानत असेल; तर लाभ कुणाच्या खिशात गेला ते सरकारने जनतेला सांगावे, असे ते म्हणाले. तर दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतरही नोटाबंदीसाठी सांगण्यात आलेले कुठलेच हेतू साध्य झालेले नाहीत, असे बसपच्या प्रमुख मायावती यांनी एका निवेदनात म्हटले. भाजपने परदेशातून काळा पैसा आणण्याचे आणि अच्छे दिन आणण्याचे आश्‍वासन जनतेला दिले होते. त्यापैकी काहीच न झाल्याने जनतेमध्ये नाराजी असल्याचेही त्यांनी म्हटले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)