केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि जनतेत दारिद्य्र

जनसंघर्ष यात्रेत काँग्रेस नेत्यांची भाजपवर टीका

कराड, दि. 3 (प्रतिनिधी) -रात्रीच्या घोषणा करणारे मोदी सरकार खतरनाक सरकार आहे. सात दशकांत देशाचा काहीच विकास झाला नाही. जो झाला तो फक्त मागील साडे चार वर्षातच झाला, असे मोदी म्हणतात. याउलट गेल्या सत्तर वर्षांत काँग्रेसने निर्माण केलेली विकासाची व्यवस्था उध्दवस्त करण्याचे काम मोदी सरकारने केल्याचा आरोप करत केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि जनतेत दारिद्य्र असल्याची खरमरीत टीका काँग्रेस नेत्यांनी जनसंघर्ष यात्रेत केली.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने कोल्हापुरातून सुरू केलेल्या जनसंघर्ष यात्रेचे सांगली जिल्हयातून रविवारी सायंकाळी कराड शहरात आगमन झाले. यावेळी यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रवक्ते व आ. सचिन सावंत, आ. शरद रणपिसे, आ. सतेज पाटील, आ. विश्वजीत कदम, आ. जयकुमार गोरे, आ. आनंदराव पाटील, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
ना. विखे-पाटील म्हणाले, काँग्रेस सरकारच्या काळात सुरू झालेल्या योजनांची नावे बदलण्याचे राजकारण भाजप सरकार करत आहे. फसव्या घोषणांमुळे सरकारवरील जनतेचा विश्वास उडाला आहे. ‘कॉमेडी वुईथ कपिल शर्मा’ याप्रमाणे ‘कॉमेडी वुईथ मोदी’ शो सुरू आहे. त्यांच्या भुलथापांना सर्वसामान्य जनतेने बळी पडू नये असे आवाहनही त्यांनी केले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 2014 मध्ये 61 टक्के मते भाजप विरोधात होती. आता 2019 सालच्या निवडणुकीत सर्व विरोधी पक्ष एकत्र येत असल्याने भाजपचा पराभव निश्चितपणे होणार आहे. कारण मोदी सरकार सत्तेत आले तर देशाची लोकशाही संपुष्टात येणार आहे. त्यामुळे लोकशाही वाचवण्याच्या प्रक्रियेत सर्व जनतेने सहभागी व्हावे. सरकारने आश्वासने न पाळल्याने जनतेत आक्रोश आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारला आपण जनतेत लोकप्रिय असल्याचे वाटत असेल तर त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवाव्यात. सरकार विरोधात जनतेत असलेल्या आक्रोशाला वाट दाखवण्यासाठीच काँग्रेसने जनसंघर्ष यात्रा काढली आहे. पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना दुष्काळ आणि गारपीठीतील शेतकर्‍यांना भरभरून मदत केली. तर सध्या सत्तेत असलेले भाजप सरकार शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात असमर्थ ठरले आहे. राज्यातील सामाजिक व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे.
यावेळी सचिन सावंत, सतेज पाटील, शरद रणपिसे, आ. अमर काळे, विश्वजीत कदम, चारूलता टोकस यांनी मनोगत व्यक्त केले. आ. आनंदराव पाटील यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)