शिक्रापूर-केंदूर (ता. शिरूर) येथे आठ दिवसांपासून विहिरीमध्ये पडलेल्या कोल्ह्याला या भागातील वनविभागाचे कर्मचारी तसेच दोन सर्पमित्रांच्या मदतीने जीवदान देण्यात यश आले. त्याला पुढील देखभालीसाठी कात्रज पुणे येथील प्राणी संग्रहालयात दाखल करण्यात आले आहे.
केंदूर येथील पाचवडवस्ती येथे गुंडाजी देवराम साकोरे यांच्या विहिरीमध्ये आठ दिवसांपासून एक कोल्हा विहिरीमध्ये पडलेला होता, तर बुधवारी सकाळी साकोरे यांनी काही नागरिकांच्या मदतीने विहिरीमध्ये कोल्हा पडल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे यांना कळविली. त्यानंतर वनमजूर आनंदराव हरगुडे, सर्पमित्र गणेश टिळेकर, प्रतिक लांडगे यांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यावेळी अतिशय जुन्या अशा पद्धतीच्या विहिरीमध्ये विहिरीतील कपारीमध्ये कोल्हा असल्याचे आढळून आले. त्यानंतर गणेश टिळेकर, प्रतिक लांडगे यांनी विहिरीमध्ये उतरत पोते व दोरीच्या सहाय्याने मोठ्या शिताफीने त्या कोल्ह्याला विहिरीतून बाहेर काढले. त्याला केंदूर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले त्यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी शांतीलाल मोहोळकर यांनी त्याची तपासणी केली असता त्याची प्रकृती खालावली असल्याचे निदर्शनास आले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला पुढील देखभालीसाठी कात्रज येथील प्राणी संग्रहालयात सोडण्यात आले. रात्रीच्या सुमारास कुत्रे मागे लागल्याने अथवा भक्षाच्या शोधात कोल्हा विहिरीत पडला असावा असा अंदाज वनमजूर हरगुडे यांनी वर्तविला.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा