कॅन्टोन्मेंटचा निकष बोपखेल, पिंपळे सौदागरच्या रस्त्यांना लावा

पिंपरी – केंद्रीय संरक्षण मंत्र्यांच्या आदेशानंतर पुणे कॅन्टोन्मेंटच्या हद्दीतील वानवडी बाजारातील राइट फ्लॅंक रस्ता आणि घोरपडीतील एलाइट लाइन्स रस्ता नागरिकांसाठी खुला केला आहे. याच निकषावर बोपखेल येथील रस्ता व पिंपळे सौदागर येथील रक्षक सोसायटी ते कुंजीरवस्ती रस्ता नागरिकांना खुला करण्यात यावा, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे.

आमदार जगताप यांनी यासंदर्भात संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांना लेखी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चारही बाजूने लष्कराची हद्द आहे. त्यामुळे लष्कराच्या हद्दीतून जाणारे रस्ते व इतर सुविधांबाबतचे अनेक प्रश्‍न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. बोपखेल ग्रामस्थांसाठी तातडीने रस्ता उपलब्ध करून द्यावा, तसेच पिंपळे सौदागर येथील रक्षक सोसायटी ते कुंजीरवस्ती रस्ता नागरिकांना खुला करण्यात यावा, या मागणीसाठी यापूर्वीच तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची दिल्ली येथे भेट घेतली होती.

आमदार जगताप यांनी दिल्ली येथे संरक्षणमंत्र्यांची भेट घेऊन बोपखेल ग्रामस्थांना दळणवळणासाठी होणाऱ्या त्रासाची कल्पना दिली होती. याशिवाय पिंपळे सौदागर येथील लष्कराच्या हद्दीतून जाणारा रक्षक सोसायटी ते कुंजीरवस्ती रस्ता बंद केल्याने या परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी केली होती. संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी बोपखेलवासीयांसाठी पर्यायी रस्ता आणि रक्षक सोसायटी ते कुंजीरवस्ती रस्त्याबाबत ठोस तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांच्यानंतर निर्मला सीतारामन यांनी या पदाची सूत्रे घेतली.

नुकतेच निर्मला सीतारामन यांनी कॅन्टोन्मेंट मधील बंद रस्ते तातडीने खुले करण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक लष्करी प्रशासनाने पुण्यातील कॅन्टोन्मेंटच्या हद्दीतील रस्ते खुले केले. याच धर्तीवर बोपखेल, पिंपळे सौदागरचे रस्ते खुले करावेत, असे आमदार जगताप यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)