कॅण्डी कसोटी:सलामीवीर शिखर धवनचे शतक

कॅण्डी : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कॅण्डी कसोटीत भारताचा सलामीवीर शिखर धवनने शतक झळकावले आहे. धवनने 107 चेंडूत शतक ठोकले असून त्याचे हे कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक ठरले आहे. दुसरीकडे शतकाच्या दिशेने  जाणारा के एल राहुल मात्र शतकापासून वंचित राहिला. राहुल वैयक्तिक 85 धावांवर झेलबाद झाला. मात्र धवन-राहुलने तब्बल 188 धावांची भागीदारी करुन दमदार सलामी दिली.
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून टीम इंडियाने पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर के एल राहुल आणि शिखर धवन यांनी आश्वासक सुरुवात केली. सलामीवीरांनी अर्धशतकं झळकावत, टीम इंडियाची धावसंख्या झटपट शंभरी पार केली. के. एल. राहुल आणि शिखर धवन यांनी आश्वासक सुरुवातीनंतर, वैयक्तिक अर्धशतकं पूर्ण केली. राहुलने 67 चेंडूत तर धवनने  अवघ्या 45 चेंडूत अर्धशतक झळकावले. राहुलचं हे सलग सातवं अर्धशतक ठरलं. दरम्यान, अखिलाडूवृत्तीमुळे निलंबन झालेल्या फिरकीपटू रवींद्र जाडेजाच्या जागी, चायनामन गोलंदाज कुलदीप यादवचा या कसोटीत समावेश करण्यात आला आहे.
तत्पूर्वी, भारताने या कसोटी मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. पण तिसरी कसोटी जिंकून श्रीलंका दौऱ्यात नवा इतिहास घडवण्याची संधी विराट कोहलीच्या टीम इंडियाला आहे. भारताने श्रीलंका दौऱ्यातली तीन कसोटी सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली, तर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाचा हा परदेश दौऱ्यातला पहिला क्लीन स्वीप ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)