कृष्णेची गतवैभवाकडे वाटचाल ः विष्णुपंत शिंदे

शिवनगर : कृष्णा कारखान्यात गळीत हंगामात उत्पादीत झालेल्या 10 लाख एक व्या साखर पोत्याचे पूजन करताना ज्येष्ठ नेते विष्णुपंत शिंदे, चेअरमन डॉ. सुरेश भोसले, व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, सर्व संचालक व मान्यवर.

कृष्णा कारखान्यात 10 लाख 1 व्या साखर पोत्याचे पूजन

कराड, दि. 21 (प्रतिनिधी) – शेतकरी सभासदांना दिलेली आश्वासने तंतोतंत पाळत कृष्णा कारखान्याची गतवैभवाकडे वाटचाल सुरु आहे. चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शना खालील संचालक मंडळाने सभासद हिताचे निर्णय राबवत सभासंदाचा विश्वास सार्थ ठरवला आहे, असे गौरवोद्‌गार राजारामबापू कारखान्याचे माजी संचालक ज्येष्ठ नेते विष्णुपंत शिंदे यांनी काढले.
य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2018-19 च्या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या 10 लाख 1 व्या साखर पोत्याचे पूजन ज्येष्ठ नेते विष्णुपंत शिंदे यांच्या हस्ते, चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, जि. प. सदस्या सौ. शामबाला घोडके, व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी संचालक लिंबाजीराव पाटील, धोंडीराम जाधव, गुणवंतराव पाटील, पांडूरंग होनमाने, कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी, पंचायत समीती सदस्य सुनिल पोळ, कराड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम. के. कापूरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विष्णुपंत शिंदे पुढे म्हणाले, वारंवार सत्तांतर होणे सभासदांच्या दृष्टीने धोक्‍याचे असते. समृध्दी व विश्वास हा सहकाराचा पाया आहे. मध्यंतरीच्या काळात कृष्णेत अनिष्ट प्रथा बोकाळल्या होत्या. मात्र आज कृष्णा कारखान्याचा कारभार पारदर्शकपणे सुरू आहे. साखरेला दर कमी असतानाही कृष्णा कारखान्याने सभासदांना चांगला दर दिला आहे. एफआरपी पेक्षा जास्त दर कृष्णा कारखान्याने दिला आहे. मोफत साखर देण्याचा अभिनव उपक्रम राबवून कृष्णेने राज्यात साखर कारखानदारीला एक आदर्श घालून दिला आहे.
चेअरमन डॉ. सुरेश भोसले म्हणाले, पश्‍चिम महाराष्ट्रात साखर कारखानदारीमुळे आर्थिक व औद्योगीक प्रगती झाली आहे. सभासदांना एफआरपी देण्यासाठी साखरेला चांगला भाव मिळणे आवश्‍यक आहे. साखरेचा चांगला भाव स्थिर राहणे हा अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगासाठी उपाय आहे. कृष्णा कारखान्याने 10 लाख साखर पोती उत्पादीत केली असून हा गाळपाचा एक टप्पा पुर्ण केला आहे. यात अधिकारी, कर्मचारी व सेवकांनी चांगले काम केले आहे. यापुढेही अजून हंगाम बाकी आहे. हा सिझन लांब चालणार नसून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालू राहिल. शेतकऱ्यांना तोडणीसाठी येणाऱ्या अडचणी शेती विभागाने सोडवाव्यात.
कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी यांनी प्रास्ताविकात कारखान्याच्या कामकाजाचा आढावा सादर केला. हंगामात आजपर्यंत 7 लाख 92 हजार 940 मेट्रीक टन ऊसाचे गाळप होऊन 10 लाख 1 हजार 480 साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. कारखान्याचा दैनंदिन साखर उतारा 13.21 इतका असून सरासरी साखर उतारा 12.54 टक्के आहे. सध्या प्रतिदिन सरासरी 8 हजार मेट्रीक टनापेक्षा जादा ऊसाचे गाळप होत आहे. को-जनरेशन प्रकल्पात आत्तापर्यंत सव्वा तीन कोटी युनिट वीज निर्माण होऊन दिड कोटी युनिट वीज निर्यात केली आहे. तसेच डिस्टलरीमधून प्रतिदिन एक लाख लिटर्स पेक्षा जास्त अल्कोहोल निर्मीती होत आहे, अशी माहिती दळवी यांनी दिली.
याप्रसंगी कारखान्याचे सेक्रेटरी मुकेश पवार, प्रोसेस मॅनेजर डी. जी. देसाई, चिफ इंजीनीअर सुहास घोरपडे, असि. जनरल मॅनेजर डिस्टलरी प्रतापसिंह नलवडे, गिरीश इस्लामपूरकर, शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, अरुण पाटील, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, डी. व्ही. कुंभार, रविंद्र देशमुख, सुयोग खानविलकर, गजानन प्रभुणे, जी. बी. मोहिते, अनिल पवार, डी. टी. पाटील, शिवाजी बाबर, निरंजन पवार, व्ही. जी. पवार, संपतराव पाटील यांच्यासह सभासद, शेतकरी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामभाऊ सातपुते यांनी सुत्रसंचालन केले. जगदीश जगताप यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)