कृष्णा पुलाच्या तोंडावर साठतोय कचरा

स्वच्छता अभियानाला नागरिकांकडूनच खो : पालिकेचे होतेय दुर्लक्ष

कराड, दि. 14 (प्रतिनिधी) – एकीकडे शहरात स्वच्छता अभियान जोमाने राबविले जात असताना शहरातील दळणवळणाचा महत्त्वाचा मार्ग असणाऱ्या नवीन कृष्णा पुलावर मात्र कचऱ्याचे ढीग रचलेले दिसत आहेत. नागरिकांकडून स्वच्छता अभियानाला खो घातला जात असून पालिका प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. या कचऱ्यामध्ये असणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्या वाऱ्याने उडून वाहनधारकांच्या तोंडावर येत असल्याने अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तसेच या साचलेल्या कचऱ्यावर कुत्र्यांचेही साम्राज्य तयार होत आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सर्वत्र स्वच्छता मोहिम जोमाने राबवली जात आहे. अनेक ठिकाणी नागरिकांकडून मध्येच कोठे कचरा टाकलेला दिसल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईही केली जात आहे. गेल्या दोन महिन्यात जवळजवळ वीस ते पंचवीस नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दर दोन दिवसांनी शहरातील मुख्य भागांवर आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रत्यक्षात जावून स्वच्छतेविषयी जनजागृती करत आहेत. परंतु कृष्णा पूल परिसरात पालिका कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसते.
कराड-ओगलेवाडी रोडवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे नवीन कृष्णा पूलाचे काम झाले. दिवसेंदिवस वाहनधारकांची संख्या वाढत असल्याने तसेच पावसाळ्यात जूना पूल पाण्याखाली जात असल्याने नवीन पुलामुळे सर्वांचीच सोय झाली. तसेच दळणवळणासाठीही फायदेशीर मार्ग झाला. मात्र पुलाच्या तोंडावरच शहरातील काही नागरिक घरी साठलेला कचरा टाकत असल्याचे दिसते. पालिकेकडून घरोघरी घंटागाडी सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु घंटागाड्यांची वेळ अनियमित असल्यामुळे घरी साठलेला कचरा कोठे तरी टाकला जातो. यात प्रामुख्याने नोकरदार वर्गाचा समावेश असल्याचा पालिका प्रशासनाचा अंदाज आहे.
नोकरीची वेळ सांभाळण्यासाठी घरी साठलेला कचरा घंटागाड्यात न टाकता रस्त्याच्या कडेला फेकला जातो. पालिकेकडून शहर स्वच्छ अभियानासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी नागरिकांनीही साथ देणे गरजेचे आहे. प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. तरीही प्लॅस्टिक पिशवीचा नागरिकांकडून अट्टाहास होतो. यावर स्वत:च बंदी घालणे काळाची गरज आहे. या प्लॅस्टिक पिशव्या वाऱ्याने उडून जावून वाहनधारकांच्या तोंडावर येतात. त्यामुळे एखादा अपघात घडू शकतो. त्यामुळे नागरिकांनीही दक्षता घेवून पालिकेच्या अभियानास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्लॅस्टिक पिशव्या येतात तरी कोठून

पालिका प्रशासनाकडून प्लॅस्टिक बंदीविरोधी मोहिम राबवली जात आहे. शहरातील अनेक दुकानांमध्येही प्लॅस्टिक पिशव्यांना बंदी घालण्यात आली आहे. तरीही नागरिकांकडे प्लॅस्टिक पिशव्या नक्‍की येतात तरी कोठून असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. मुख्यत्वे करून या पिशव्यांमधून घरी उरलेले अन्न भरून बाहेर फेकले जाते. या अन्नावर मोकाट कुत्री ताव मारताना दिसतात. पालिकेच्या अभियानाला नागरिकांनीही साथ देणे गरजेचे आहे.

प्लॅस्टिकविरोधी कडक मोहिम

शहर स्वच्छता अभियानांतर्गत आरोग्य विभागाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. अनेक वेळा दंडात्मक कारवाईही केली जाते. तरीही शहरात अनेक ठिकाणी नागरिकांकडून कचरा टाकला जातोय. यासाठी कठोर पावले उचलली जाणार आहेत. तसेच प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी आणण्यासाठीही येत्या 23 जूनपासून कडक मोहिम राबविणार आहे.
प्रियांका प्रीतम यादव
सभापती, आरोग्यविभाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)