कृष्णा खोरे महामंडळाला अभ्यासू नेतृत्व मिळाले

 रहिमतपूर येथे प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्या सत्कार प्रसंगी पोपटराव पवार, चंद्रकांत दळवी, सुनिल माने, सौ. चित्रलेखा माने कदम.

पोपटराव पवार : रहिमतपूरला ना. नितीन बानुगडे-पाटील यांचा नागरी सत्कार

रहिमतपूर, दि. 4 (प्रतिनिधी) – कृष्णा खोरे विकास महामंडळाला प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्यासारख्या अभ्यासू नेतृत्व मिळाले आहे. संशोधनातून इतिहास शोधणारे पाटील आपल्या नेतृत्वकाळातच कृष्णा खोऱ्याचे पाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पोहोचवतील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे ना. नितीन बानुगडे-पाटील यांचा जाहीर नागरी सत्कार आयोजित करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी महसूल आयुक्त चंद्रकांत दळवी होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सौ. चित्रलेखा माने-कदम, माजी नगराध्यक्ष संपतराव माने, वासुदेव माने, प्रा. भानुदास भोसले, नगराध्यक्ष आनंद कोरे, उपनगराध्यक्ष विद्याधर बाजारे, अविनाश माने, मधुसूदन मोहिते-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पोपटराव पवार म्हणाले, रहिमतपुरचा परिसर रत्नाची खाण आहे. या मातीत अनेक नरवीर जन्माला आले आहेत. संत, कवी, नाटककार, संशोधक, राजकारणी अशी नररत्ने जन्माला आलेल्या भूमीचा प्रा. बानुगडे-पाटील यांच्या मंत्री पदामुळे खऱ्या अर्थाने सन्मान झाला आहे.
चंद्रकांत दळवी म्हणाले, प्राध्यापक, इतिहास संशोधक, शिवव्याख्याते, शिवसेना उपनेते आणि कृष्णा खोरे विकास मंडळाचे उपाध्यक्ष असा प्रवास करणारे प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पदाची उंची वाढली. कृष्णा खोरेअंतर्गत काही ठिकाणी कामे खूप लाबंली आहेत आणि खूप अडचणी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याचे आव्हान एक शेतकरी म्हणून ना. बानुगडे-पाटील यांच्यापुढे आहे. ते आव्हान स्वीकारून आपल्या वेगळ्या कामाचा ठसा उमटवा. तुमचे काम लोकांच्या कायमचे स्मरणात राहिले पाहिजे, असे काम करा.
सत्काराला उत्तर देताना ना. बानुगडे-पाटील म्हणाले, रहिमतपूरच्या मातीत जन्माला आलो. या मातीने घडवलं, संस्कार दिले म्हणून या पदापर्यंत पोहोचलो आहे. प्रचंड ऊर्जेची माणसं या मातीत जन्माला आली आहेत. या माणसांचा विचार वारसा घेऊन पुढे जायचे आहे. आजचा सत्कार खूप मोठा आहे. घरच्या लोकांचे कौतुक विसरता येणार नाही. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा करण्याचे काम मिळाले, हे माझे भाग्य आहे.
यावेळी सर्वपक्षीय नेते व्यासपीठावर होते, हा कौतुकाचा विषय झाला होता. नागरिकांच्या वतीने मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन नितीन बानुगडे-पाटील यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक आनंदा कोरे यांनी केले. विद्याधर बाजारे यांनी आभार मानले. प्रचंड पावसातही नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

-Ads-

 

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)