कृष्णराज महाडिकचे कोल्हापुरात जल्लोषात स्वागत

कोल्हापूर – इंग्लंडमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या, बी.आर.डी.सी. ब्रिटीश फॉर्म्युला थ्री स्पर्धेत कोल्हापूरच्या कृष्णराज महाडिकनं पहिल्या स्थानावर झेप घेतली. तब्बल 19 वर्षांनंतर कृष्णराजच्या रुपानं या विश्‍व मानांकित रेसचं विजेतेपद भारताला मिळालं आहे. इंग्लंड मधील यशानंतर कृष्णराजचं आज कोल्हापुरात आगमन झालं. रेसिंग सारख्या थरारक क्रीडा प्रकारात उत्तुंग कामगिरी केलेल्या कृष्णराजचं ताराराणी चौकात कोल्हापूरकरांनी जल्लोषी स्वागत केलं. मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर, युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांनी आणि क्रीडा रसिकांनी भव्य रॅली काढून, कोल्हापूरच्या या खेळाडूच्या यशाचा आनंद घेतला. शहराच्या मुख्य मार्गावरुन निघालेल्या रॅलीवेळी हजारो कोल्हापूरकरांनी कृष्णराजवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

आज कृष्णराज कोल्हापुरात दाखल झाला. ताराराणी चौकात आगमन झालं आणि फटाक्‍यांच्या आतषबाजीत त्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं. छत्रपती ताराराणी यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन, कृष्णराजनं माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक आणि मान्यवरांचे आशिर्वाद घेतले. त्यानंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, महापौर हसिना फरास, गोकुळचे अध्यक्ष विश्‍वास पाटील, अरुण नरके यांनी कृष्णराजचा सत्कार केला. यावेळी रामराजे कुपेकर, प्रशिक्षक सचिन मंडोडी, रामराजे कुपेकर, धैर्यशील देसाई, सुहास लटोरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, विजय सुर्यवंशी, किरण शिराळे, सत्यजित कदम, सुनील कदम, शिवाजीराव कदम, पृथ्वीराज महाडिक, विश्‍वराज महाडिक, मोहितेज रेसिंगचे अभिषेक मोहिते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. डोक्‍यावर फेटा परिधान केलेला आणि हातात विजयाचा चषक उंचावत, कृष्णराजनं कोल्हापूरवासीयांना अभिवादन केलं. त्यानंतर ओपन जीप मधून त्याच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर शहरातील विविध ठिकाणाहून मिरवणूक निघत शेवटी शिवाजी चौकात रॅलीची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)