कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाबाबत सकारात्मक निर्णय घेऊ

नारायणगाव-महाराष्ट्र राज्यात सन 2012-13 पासून कृषी तंत्र निकेतन हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम चालू शैक्षणिक वर्षापासून बंद करण्याबाबत कृषी विद्यापीठांनी संबंधित संस्थांना कळविले आहे. कृषी तंत्र निकेतन अभ्यासक्रमाबाबत विद्यापीठांनी घेतलेल्या निर्णयामुळे उद्‌भवलेल्या समस्येबाबत कृषी तंत्र आणि संलग्न संस्था महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांची नुकतीच मंत्रालयात भेट घेऊन निवेदन सादर करून सविस्तर चर्चा केली.
यावेळी कृषी खात्याचे प्रधान सचिव बिजय कुमार यांनी पाटील यांना याविषयी सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रविंद्र जगताप, शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसाडिकर हे उपस्थित होते. या बैठकीसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतला. यावेळी कृषी महाविद्यालय संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, ग्रामोन्नती मंडळ, नारायणगावचे कार्याध्यक्ष कृषीरत्न अनिलतात्या मेहेर, प्रकाश पाटे, साहेबराव नवले, प्रभाकर चांदणे, निलेश नलावडे, अरविंद पोटे, ज्ञानदेव वाफारे, संजय भांड, गोवर्धन चव्हाण, प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड, सोमनाथ काटकर उपस्थित होते.
विद्यापीठाचे पातळीवरून कृषी तंत्र निकेतन पदविका अभ्यासक्रम बंद केल्यामुळे राज्यभरातील शिक्षण घेणारे 16 हजार विद्यार्थी व पालक संभ्रमावस्थेत सापडले आहेत. या विषयावर उपाय म्हणून पाचव्या अधिष्ठाता समितीच्या अहवालामध्ये कृषी पदवी अभ्यासक्रम बदल करून व्यावसायिक करण्याबाबत समितीने सुधारित अभ्यासक्रम शिफारस केला आहे. त्याच आधारे कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम व्यावसायिक आणि सुधारित करावा. तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या अभ्यासक्रम ठेवावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
यापुर्वीही पांडुरंग फुंडकर कृषिमंत्री असताना या विषयावर बैठक बोलावली होती; परंतु चारही विद्यापिठांचे कुलगुरु या बैठकीसाठी हजर राहिले नाहीत. त्यामुळे या विषयावर तोडगा निघू शकला नव्हता. याप्रसंगी कृषी मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कृषी तंत्र निकेतन हा सन 2012पासून सुरु असणारा अभ्यासक्रम कृषि विद्यापीठांनी सुरु ठेवावा यासाठी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरु बरोबर विचार विनिमय करण्यासाठी दि. 18 जून रोजी एकत्रित बैठक बोलावली जाईल. अभ्यासक्रम व्यावसायिक दर्जा, कृषी पदवीसाठी प्रवेश, अभ्यासक्रम सुधारणा, या प्रश्नांबाबत सुद्धा सकारात्मक विचार करुन निर्णय घेण्यात येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. या प्रश्नांबद्दल विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेऊन हा अभ्यासक्रम सुरू ठेवण्याची जोरदार मागणी केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)