कृषी क्षेत्राला दिशा देणारे गाव : पारगाव

नियोजनाच्या जोरावर शेतीद्वारे मानवी जीवनात किती आमूलाग्र बदल घडू शकतात याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्रीगोंदा तालुक्‍यातील पारगाव सुद्रिक हे गाव. ते श्रीगोंदे शहराच्या पश्‍चिमेला सुमारे 6 किलोमीटरवर आहे. 13 हजार लोकसंख्येचे छोटे खेडे. माळजमीन, पाण्याचे दुर्भीक्ष, शेतीवरील संकटे यावर मात करीत अफाट परिश्रम, कल्पकता व नवनिर्मितीचा ध्यास या बळावर येथील शेतक-यांनी माळरानाचे रूपांतर एका नंदनवनात केले आहे. या गावाने केलेल्या अफाट प्रगतीचा घेतलेला हा मागोवा.

पर्जन्यछायेखालील तालुका म्हणून श्रीगोंद्याची सर्वदूर ओळख. मात्र, कुकडी प्रकल्पाचे पाणी तालुक्‍यात आले अन्‌ येथील शेतीवर असणारे दुष्काळी भागाचे अरिष्ट दूर होऊ लागले. या बदलत्या परिस्थितीचा फायदा घेत पारंपरिक शेतीऐवजी काही तरी नवीन करण्याचा ध्यास पारगाव येथील काही तरुणांनी घेतला.
गावात पूर्वी फक्त गुंठ्यात भाजीपाला केला जात असे. या तरुणांनी महाराष्ट्र व परराज्यात होत असलेल्या शेतीतील विविध प्रयोगांची माहिती संकलित केली. तेथे भेटी दिल्या, त्यातील नफ्या-तोट्याच्या बाजू तपासल्या अन्‌ विविध पीक व फळबागा मासबेसवर म्हणजे मोठ्या प्रमाणावर एकत्रितपणे करण्याचा प्रयोग सुरू केला. उदाहरणार्थ, विविध शेतकऱ्यांनी मिळून सुमारे 50 एकर क्षेत्रात वांग्याचे पीक घ्यायचे, सर्वांनी लागवड एकाचवेळी करायची. या अनोख्या पद्धतीमुळे एकास दुसरा मदतनीस लाभला. अनुभव वाढू लागला. आपला माल कोठे न्यायचा? कुठे किती बाजार मिळेल? वाहतूक परवडेल का? आदी अनेक प्रश्नांची उत्तरे समूह शेतीतून मिळू लागली.

गावात द्राक्ष बागेबरोबर डाळिंब बागा बहरू लागल्या. शेतकऱ्यांना चांगला दर मिळू लागल्याने त्यात गुंतवणुकीचे धाडस वाढले. आज पारगावात नजर टाकाल तेथे हिरवाई दृष्टीस पडते. माळरानावर शेकडो द्राक्षबागा दिसतात. जागोजागी डाळिंब बागा उभ्या आहेत. लिंबाच्या बागा तर पूर्वीपार होत्याच, त्यात कित्येकपटीने वाढ झाली. देशातील बड्या बाजारात येथील लिंबांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. छत्तीसगडच्या विमल चावला या शेती शास्त्रज्ञाने शेतीत काही अभिनव प्रयोग राबविले आणि यशस्वी केले. हे प्रयोग पाहून, अभ्यासून त्यांचे अनुकरण येथील शेतकऱ्यांनी केले आहे. आपले अनुभव इतरांना सांगायचे, त्यांचे ज्ञान समजून घ्यायचे या कल्पनेतून राज्यातील कल्पक व प्रयोगशील शेतकऱ्यांचे गट माऊली हिरवे यांनी तयार केले आहेत. पारगावसारख्या छोट्याशा गावाने प्रयत्न करून माळाचा मळा केला.. अन्‌ येथील शेतीमाल समुद्रापल्याड नेला. पारगाव येथील द्राक्षे, डाळिंब, वांगी, टोमॅटो, लिंबू, आदी शेतीमाल आता देशाच्या सीमा ओलांडून विदेशात पोहोचला आहे. यात डाळिंब व द्राक्षाने आखाती देशांना भुरळच घातली आहे. दुबई, सौदी अरेबिया, ओमान, कतार, जॉर्डन, कुवेत येथील शेखसाहेब पारगावच्या द्राक्षांच्या प्रेमात पडले आहेत, तर युरोपातील साहेब मंडळीदेखील डाळिंब व द्राक्षांची “फॅन’ झाली आहे. निर्यातीसंदर्भात युरोपाप्रमाणेच आखाती देशांनी कीडनाशकाचे कठोर मानांकन निश्‍चित केले आहेत. त्याची अंमलबजावणी इथले शेतकरी काटेकोरपणे करतात. या गावातल्या प्रत्येकाच्या हाताला पुरेसं काम देऊनही इथं बाहेरच्या अनेकांना रोजगार मिळाला आहे. पारगावात बिहारमधील तब्बल दोन हजार मजूर आहेत. शेतातील मजुरीची पारंपरिक पद्धत येथे चालत नाही. रोजंदारीप्रमाणे कामाचा दर न देता ठेकेदारी पद्धतीने मजुरांना पगार म्हणजेच त्यांचे ठरलेले पैसे मिळतात. पारगाव येथील कोणाही शेतकऱ्याकडे कमाल जमीन 20 एकरापेक्षा अधिक नाही. एक एकर ते पाच एकर यादरम्यान शेती असणारेच अधिक आहेत. गावात कोणीही जमीन विकत नाही हे इथल्या शेतकऱ्यांचे वैशिष्टय. “आपली जमीन विकाऊ नव्हे तर पिकाऊ करावी’ ही यामागील भावना. काही अपवादात्मक स्थितीत कोणाला जमीन विकावी लागली तर एकरी दर मिळतो तब्बल 25 लाख रुपये.

पारगावमध्ये दिवस उजाडला की लगबग सुरू होते. देवाण-घेवाण, खरेदी-विक्री, भेटी-गाठी, आदी धांदल पाहता प्रत्येकामागे जणू लगीनघाई असल्याचा भास होतो. सायंकाळीदेखील असेच चित्र असते. सकाळी दहा ते सायंकाळी सहाच्या दरम्यान गावात शुकशुकाट असतो. संचारबंदीप्रमाणे ते वातावरण असते. कारण एकच, गावातील प्रत्येक जण दिवसभर शेतात राबण्यासाठी गेलेला असतो. विशेष म्हणजे कामाचे हे वेळापत्रक सर्वांच्या इतके अंगवळणी पडले आहे की, गावातील राष्ट्रीयीकृत बॅंका व पतसंस्थांनी देखील आपल्या कामाच्या वेळा बदललेल्या आहेत. येथील बॅंक सकाळी आठला सुरू होते, दुपारी बंद होते. महत्त्वाची बाब म्हणजे एखाद्या नेत्याला किंवा पक्षाला गावात सभा घ्यायची असेल तर सकाळी किंवा संध्याकाळीच घ्यावी लागते. दिवसभरात सभेला कोरमदेखील पूर्ण होत नाही. “काम ही श्रीराम है हमारा’ ही यामागील सार्वत्रिक भावना येथे पहावयास मिळते

माऊली हिरवे यांनी पारगाव येथील पहिली द्राक्षबाग सुमारे 15 वर्षांपूर्वी लावली. कासेगाव (पंढरपूर) येथून जंगली द्राक्षवेल लावून नंतर त्यांनी त्यावर कलम केले. हा प्रयोग नवीन होता. प्रारंभी अन्य अनुभवी शेतकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडविली. परंतु, त्यांचा द्राक्षबागेचा प्रयोग यशस्वी झाला. उत्पन्न समाधानकारक मिळाले. त्यातूनच हुरूप वाढला. पूर्वी आपण आपल्या शेतात केलेले शेतीविषयक नवे प्रयोग संबंधित शेतकरी इतरांना सहजपणे सांगत नसे. विशेषत: असे प्रयोग भरपूर उत्पन्न देत असतील तर बिलकूल नाही. परंतु, माऊली हिरवे त्याला अपवाद ठरले. जे स्वतःला माहिती आहे ते इतरांना सांगून “सकल जग शहाणे करण्याच्या’ संत विचारांतून हिरवेंनी गावातील तरुणांचा गट तयार केला. अशोक होले, तुकाराम बोडखे, सुभाष शिंदे, बाळासाहेब जगताप, आदी हरहुन्नरी शेतकऱ्यांनी गावाचे रूपच बदलण्याचा निर्धार केला अन्‌ तो कृतीत देखील आणला.

इथल्या शेतकऱ्यांनी आपले श्रम, नवा विचार अंगिकारण्याची तयारी आणि प्रगत दृष्टिकोन यांच्या संगमातून या गावाचं चित्र पूर्णपणे पालटून टाकलं आहे. या श्रमलक्ष्मीने आपल्यासोबत आर्थिक समृद्धी तर आणलीच; पण विद्यालक्ष्मीही आणली. गावातील खोपटे नाहीशी झाली, त्यांची जागा सुंदर बंगल्यांनी घेतली. कोरड्या माळजमिनीवर शेततळ्यांचा ओलावा पसरला. या गावाची नोंद थोडी आकडेवारीतून घ्यायची झाली तर ती अशी असेल. शेततळी – 200, मोठे ट्रॅक्‍टर – 550, छोटे ट्रॅक्‍टर – 350, दुचाकी – 6700, कार – 200, जेसीबी मशिन – 18, पोकलेन यंत्र – 20, सुसज्ज बंगले प्रमाण – 90 टक्के, शिक्षणाचे : साक्षरतेचे प्रमाण-100 टक्के, कृषी सेवा केंद्र-6, कृषी औषध दुकाने-6, गावातील वार्षिक उलाढाल- सुमारे 600 कोटी. ही आकड्यांची झेप पुरेशी बोलकी आहे.

अर्शद अ. शेख शहर प्रतिनिधी, श्रीगोंदा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)