कृषीदूतांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर कार्य केल्यास शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटण्यास मदत होईल

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – ग्रामीण व शहरी भागातील भेद कमी करण्यासाठी शहरातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून सामाजिक बांधिलकीची खरी शिकवण मिळते. खरा भारत खेड्यात असून, भारताच्या संस्कृतीचे मूळ नैसर्गिक दर्शन खेड्यात होते. राष्ट्रीय सेवा योजनेतूनच विद्यार्थ्यांवर श्रमसंस्कार तसेच अष्टपैलू व्यक्तिमत्व घडते. या कृषीदूतांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर कार्य केल्यास शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटण्यास मदत होईल. असे प्रतिपादन उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन अकॅडेमी मुंबई संचालित पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय (आंबी ता. मावळ) यांच्या वतीने मंगळवारी (दि. 23) ते सोमवार (दि. 29) या सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना स्वच्छ व स्वस्थ भारत अभियान विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्‌घाटनप्रसंगी केले.

-Ads-

“इलेक्‍ट्रॉनिक गॅझेटचे दुष्परिणाम’ या विषयावर प्रादेशिक परिवहन विभाग सेवानिवृत्त अधिकारी हरिश्‍चंद्र गडसिंग यांचे मार्गदर्शन झाले. “युवकांचे सामाजिक योगदान’ या विषयावर विपुल धनगर यांचे मार्गदर्शन झाले. विनोदातून संवाद “निरोगी जीवनाचे रहस्य हास्य’ विषयावर प्रा. महादेव वाघमारे यांचे मार्गदर्शन झाले. “महिलांचे आरोग्य’ विषयावर आयुर्वेदाचार्य डॉ. ज्योती मुंडर्गी यांचे मार्गदर्शन झाले. “राष्ट्रशक्ती युवाशक्ती’ विषयावर आकाश पाटील यांचे मार्गदर्शन झाले. अन्य मान्यवरांनी वैचारिक व्याख्यानातून स्वयंसेवक व ग्रामस्थांचे प्रबोधन केले

या वेळी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील, संचालक डॉ. आर. वस्सपनवरा, संपर्क अधिकारी ऍड. सुशांत पाटील, प्रशासकीय अधिकारी बी. एस. गायकवाड, कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रशांत घाडगे, प्रा. सुधाकर निंबाळकर, प्रा. किरण गोसावी, प्रा. सुधीर शिंदे, सरपंच नंदाबाई घोजगे, उपसरपंच जितेंद्र घोजगे, तंटामुक्ती अध्यक्ष रामनाथ घोजगे, जिल्हा भूषण धोंडिभाऊ घोजगे, देविदास पोटवडे, अमर घोजगे, सलीम खाटिक, प्रा. सुरेश घोजगे, वैभव शेरे, स्वयंसेवक व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

शिबिरामध्ये महाविद्यालयातील 50 विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घेतला. श्रमदानातून इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढली. मंदिर परिसर, अंतर्गत रस्ते व नाले स्वच्छ करण्यात आले. रोटरी क्‍लब ऑफ तळेगाव सिटीचे संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे यांच्या पुढाकाराने इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी निर्माल्य कलशाचे उद्‌घाटन करण्यात आले.
या शिबिर कालावधीत पर्यावरण, अंधश्रद्धा, स्त्रीभ्रूणहत्या, व्यसनमुक्ती, स्वच्छ भारत आदी विषयी विद्यार्थ्यांनी पथनाट्य, नाटक, गाणी व नृत्य आदी सांस्कृतिक कार्यक्रमातून समाज प्रबोधन केले. रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या वेळी 31 विद्यार्थ्यांनी रक्‍तदान केले. रक्‍त संकलन गरवारे ब्लड बॅंक मायमर मेडिकल कॉलेज तळेगाव दाभाडे यांनी केले.

शिबिराच्या समारोप प्रसंगी भैरवनाथ विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था चेअरमन पिराजी वारिंगे उपस्थित होते.
आदर्श स्वयंसेवक विकास पाटील, सुमित पाटील, मयूर शेंडगे आदींना गौरविण्यात आले. एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे उत्कृष्टपणे आंबी ग्रामपंचायत हद्दीत कार्य केल्याने शिबिरातील विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान केला. आश्‍विनी शीतकल या अपंग मुलीच्या 10 वी पर्यंतच्या शिक्षणाच्या पालकत्वाची जबाबदारी एन एस एस च्या स्वयंसेवकांनी घेतली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)