कृत्रिम तळे पुन्हा झेडपीच्या जागेत

सातारा पालिकेने मंगळवार तळ्याचा नाद सोडला

सातारा, दि. 15 (प्रतिनिधी)-
कायदेशीर कटकटी टाळण्यासाठी सातारा पालिकेने मंगळवार तळ्याचा नाद सोडला आहे. प्रतापसिंह शेती फार्मच्याच जागेत करंजे रस्त्याला (बाबर कॉलनी) येथे कृत्रिम तळे खोदण्याच्या कामाला आता युध्दपातळीवर सुरवात झाली आहे. विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्या आदेशाने यंत्रणेची चक्रे फिरली आणि तळ्याच्या कामाला सुरवात झाली आहे. श्री विसर्जनाचा पेच आता संपूर्ण मिटला असून खासदार उदयनराजे भोसले व प्रशासन यांच्यातील होऊ घातलेला संघर्ष टळल्याने बाप्पांच पावला अशी प्रतिक्रिया सातारकरांनी दिली आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवार तळे व डॉल्बीचा आग्रह धरून थेट जिल्हा प्रशासनाला आव्हान दिले होते. मंगळवार तळ्यात विसर्जनाला कोण अडवतो ते बघतोच या त्यांच्या दबंग स्टाईलमुळे कायदेशीर संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र परिस्थितीच आणि वेळेचे गांभीर्य ओळखून विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी यशस्वी तोडगा काढला. जिल्हा परिषद प्रताप सिंह शेती फार्मच्या बाबर कॉलनीतील रिकामी जागा देण्याचे आदेश आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. खासदार उदयनराजे भोसले यांनी शासकीय विश्रामगृहात म्हैसकर यांची भेट घेऊन त्यांना पर्यायी जागा देण्याची आग्रही विनंती केली होती. त्यानुसार वेगाने सूत्रे हालली आणि जलसंपदा विभागाचे दोन जेसीबी व डंपर शनिवारपासून मोहिमेवर रवाना झाले. कृत्रिम तळ्यावर विसर्जन निश्‍चित झाल्याने पालिकेत कर्मचाऱ्यांना तातडीने ऑर्डर काढण्याची लगबग सुरू झाली. 50 मीटर लांब 25 मीटर रुंद व 12 मीटर खोल व सत्तर लाख लीटर पाणी मावेल असे तळे निर्माण करण्याच्या कामाला सुरवात झाली दोन खाजगी विहिरी आणि बुधवार नाका टाकी येथून पाण्याची उपलब्धता होणार असून येत्या तीन दिवसात हे तळे पूर्ण करण्याचा जलसंपदा विभागाचे प्रयत्न आहेत. जलसंपदा विभागाकडून जेसीबी यंत्रणा व डिझेल सामग्री अदा केली जात असून त्याची देयके पालिकेने नंतर अदा करायची आहेत. तळ्याचा कागद पायाड बांधकाम, वीज तसेच लाईफ गार्ड याकरिता पालिकेने सतरा लाख रुपयांच्या निविदा यापूर्वीच प्रसिद्ध करून खर्चाची तयारी ठेवली आहे. त्यामुळे गेले महिनाभर साताऱ्यात सुरू असलेल्या श्री विसर्जनाच्या राजकीय कलहावर पडदा पडला आहे.

जागा मिळाली पण ……….. ?
जिल्हा परिषद व सातारा पालिका यांच्यातील आंतरविरोधाचे राजकीय कंगोरे खोल आहेत. भोसले मळ्यातील प्रताप सिंह शेती फार्म ला पडलेल्या संरक्षक भिंतीला विरोधाच्या राजकीय विटा कोणाच्या सांगण्यावरून लागल्या हे संपूर्ण साताऱ्याला माहित आहे. आता पुन्हा विभागीय आयुक्तांच्या आदेशाला सातारा झेडपीने तत्काळ अंमलबजावणीचा मान दिला. तरी पण ही जागा कायम स्वरूपी पालिकेला मिळावी अशी धडपड खासदार गटाची सुरू आहे. यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)