‘कूक’ हा तर क्रिकेटचा राजदूत- कोहली

लंडन: इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूकने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेबरोबरच क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. परंतु इतकेच करून तो थांबला नाही. कूकने अखेरच्या कसोटीतील पहिल्या डावांत दमदार अर्धशतक आणि शेवटच्या डावांत शानदार शतक झळकावून आपल्या कारकिर्दीची झळाळती सांगता केली. इंग्लंडनेही ही कसोटी जिंकून कूकला विजयाने निरोप दिला.

कूकच्या खेळीनंतर प्रेक्षकांनी त्याला अविस्मरणीय सलामीने निरोप दिलाच. शिवाय भारतीय खेळाडूंनीही कूकला अभिवादन करून खिलाडू वृत्तीचे दर्शन घडविले. सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना विराट कोहलीने कूकबद्दल प्रशंसोद्‌गार काढले. कूक हा क्रिकेटचा खराखुरा राजदूत असल्याचे सांगून कोहली म्हणाला की, निर्धार आणि निष्ठा या गुणांचे कूक हा मूर्तिमंत प्रतीक होता. क्रिकेटच्या मैदानावर आणि बाहेरही कूकने कधीच सभ्यपणाची सीमारेषा ओलांडली नाही. किंवा तो कधीही कोणाशी एकही नकारात्मक शब्द बोलला नाही. त्यामुळे मला स्वत:लाही कूकबद्दल अतीव आदर आहे.

दुसऱ्या डावांत 140 धावा केल्यावर निवृत्तीबद्दल फेरविचार करणार का, असे मी कूकला विचारले. परंतु त्याने ती शक्‍यता फेटाळली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दडपणातून मोकळा झाल्यामुळे तो खरोखरीच तणावमुक्‍त आणि पूर्वी कधीही नव्हता इतका आनंदी दिसतो आहे. एका संस्मरणीय कारकिर्दीबद्दल कूकचे मी अभिनंदन करतो आणि तो भविष्यात जे काही करू इच्छितो, त्यासाठी त्याला शुभेच्छा देतो.

पाचव्या कसोटीत नशिबाची साथ नाही

चौथी कसोटी गमावल्यानंतर पाचव्या सामन्यात आम्ही झुंज देऊ असे मी म्हणालो होतो आणि आम्ही तो शब्द पाळला आहे, असे सांगून कोहली म्हणाला की, दुसऱ्या डावांत ईशांतचा घोटा दुखावल्यामुळे एक गोलंदाज कमी असताना आम्हाला विजयासाठी प्रयत्न करावे लागले. ईशांतची या मालिकेतील कामगिरी पाहता तो नसल्याने आमची बाजू लंगडी पडली. परिणामी इंग्लंडला आमच्यासमोर 464 धावांचे विशाल लक्ष्य ठेवता आले. तरीही लोकेश राहुल आणि ऋषभ पंत यांनी विक्रमी भागीदारी केल्यामुळे पाचवा कसोटी सामना पाचव्या दिवसातील तिसऱ्या सत्रापर्यंत लांबला. परंतु एकंदरीत पाहता या कसोटीत आम्हाला नशिबाची साथ लाभली नाही हेच खरे.

मालिकेच्या निकालावर आम्ही निश्‍चितच समाधानी नाही. परंतु आम्ही योग्य मनोवृत्ती आणि मानसिकता ठेवूनच या मालिकेत खेळलो. तसेच प्रत्येक कसोटी सामना जिंकण्याची आम्हाला तीव्र इच्छा होती. परंतु या दौऱ्यापूर्वी आम्ही सातत्याने जिंकत होतो. त्यामुळे अनेक त्रुटी झाकल्या गेल्या होत्या. त्या उणिवा या दौऱ्यात स्पष्ट झाल्या असून आम्ही त्या दूर करण्याचा निश्‍चितच प्रयत्न करू.- विराट कोहली


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)