कुस्ती आखाड्यात पवारांचे दोन पठ्ठे लढणार

  • लोणीकाळभोर येथे महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके आणि किरण भगत पुन्हा आमने-सामने

लोणी काळभोर – भुगाव (ता. मुळशी) येथे वादळी ठरलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम लढत पैलवान अभिजीत कटके याने मारली होती. त्यात पराभूत होऊनही पहिलवान किरण भगत याने कुस्ती शौकीनांची मने जिंकत त्यानंतर सांगली येथे झालेल्या पिंजऱ्यातील कुस्तीत बेल्जियमच्या पैलवानाला आस्मान दाखवले होते. अभिजीत कटके हिंदकेसरी स्पर्धेचा उपविजेता तर भारत केसरी स्पर्धेचा विजेता ठरला आहे. या दोन्ही पैलवानांना ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी दत्तक घेतले असून त्यांच्या पुढील प्रशिक्षणाचा खर्च ते करीत आहेत. विशेष म्हणजे पवार यांचे हे दोन पठ्ठे लोणीकाळभोर (ता. हवेली) येथील मैदानात भिडणार आहेत. या दोघांत होणारी कुस्ती शौकीनांसाठीच नाही तर राजकीय आखाड्यातील मल्लांकरिताही पर्वणी ठरणारी आहे.
महाराष्ट्र केसरी किताबाकरिता 2017 मध्ये झालेल्या कुस्ती स्पर्धेत पैलवान अभिजीत कटके याने पैलवान किरण भगत याला चितपट केले होते. महाराष्ट्रातील सध्याच्या दोन नामांकित मल्लांची महाराष्ट्र केसरी लढतीनंतरची पहिलीच ऐतिहासिक कुस्ती आता 2001 मधील महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर यांच्या नेतृत्वाखालील लोणी काळभोर (ता. हवेली) येथे होत आहे. ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची वार्षिक यात्रा हनुमान जयंती म्हणजेच चैत्र पोर्णिमेला साजरी होत असून यानिमित्त या अनोख्या कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. गावचे सुपुत्र व गोकुळ वस्ताद तालमीतील मार्गदर्शक हिंदकेसरी हरिश्‍चंद्र बिराजदार यांचे शिष्य पैलवान राहूल काळभोर यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने आपल्या स्वतःच्या गावच्या यात्रेतील आखाडा चांगल्यारीतीने पार पडावा. राज्यातील नामांकित पैलवान येथील आखाड्यात यावेत, परिसरातील शौकीनांना चांगल्या कुस्त्या पहायला मिळाव्यात यासाठी विशेष प्रयत्न केले. या प्रयत्नातूनच विद्यमान महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजीत कटके व विद्यमान उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत यांची कुस्ती आयोजित करण्यात आली आहे.
या दोन्ही पैलवानांची महाराष्ट्र केसरी स्पर्धेनंतरची ही पहिली कुस्ती होत आहे. राहुल काळभोर यांच्या नेतृत्वाखालील लोणी काळभोर ग्रामस्थांच्या प्रयत्नांना याकामी यश मिळाले असून ही कुस्ती तसेच संपूर्ण आखाडा दर्जेदार व्हावा, कुस्तीगीर व प्रेक्षकांत देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कुठे कमतरता राहू नये यकारिता लोणी काळभोर येथे जय्यत तयारी केली जात आहे.

लोणीकाळभोर येथे दि. 1 एप्रिलला दुपारी तीन नंतर या मुख्य कुस्ती बरोबरच 25 निकाली कुस्त्या होणार असून 26 लढतींसाठी एकूण सोळा लाख रुपयांची रोख बक्षिसे गावकऱ्यांकडून विजेत्या मल्लांना दिली जाणार आहेत. कुस्ती मैदानात एकूण तीन एलसीडी टिव्ही लावण्यात येणार आहेत. या टिव्हीवर कुस्तीचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे, त्याबरोबरच युट्यूबवरही संपूर्ण आखाड्याचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या आखाड्यात पंचाचे निर्णय अंतिम राहणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)