कुसेगाव वनविभागाच्या हद्दीतील पाणवठ्यांत टॅंकरने सोडले पाणी

वरवंड- पाटस (ता.दौंड) येथील नागेश्वर मित्र मंडळ आणि कै. मंगेश दोशी मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत कुसेगाव वनविभागाच्या हद्दीतील पाणवठ्यात टॅंकरने पाणी सोडण्यात आले. या सामाजिक बांधिलकीचे पाटस परिसरातील सर्व नागरिकांतून कौतुक करण्यात येत आहे.
कुसेगाव परिसरातील वनविभागाच्या हद्दीत हरणे, ससे यांसह सरपटणारे वन्यजीव आणि पक्षांची संख्या मोठी आहे. दरवर्षी उन्हाळ्यात हरिण आणि इतर वन्यप्राणी पाण्याच्या शोधात लोकवस्तीकडे येतात. कुत्र्यांच्या हल्ल्‌यात जखमी होतात किंवा मृत्यूमुखी पडतात. यामुळे वन्यप्राण्यांसाठी उन्हाळ्यात पाण्याची सोय करण्यासाठी पाटस गावचे माजी उपसरपंच कै. मंगेश दोशी यांनी वनविभागाच्या हद्दीतील कृत्रिम पाणवठ्यात टॅंकरने अनेकदा पाणी सोडले होते. मंगेश दोशी यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे हे काम थांबवायचे नाही, या उद्देशाने नागेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष शिवाजी ढमाले यांच्यासह इतर सदस्यांनी ठरवले. त्यानुसार कुसेगाव वनविभागाच्या हद्दीतील पाणवठ्यात टॅंकरने पाणी सोडून मंगेश दोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कै. मंगेश दोशी यांनी सुरू केलेले कोणतेही काम थांबणार नाही. याची जबाबदारी आमची आहे, असे शिवाजी ढमाले यांनी सांगितले. यावेळी राहुल आव्हाड, पोपट गायकवाड, अंकुर मंगेश दोशी, जाकीर तांबोळी, दीपक जाधव, संपत भागवत, गणेश रंधवे, राहुल शितोळे, विनोद भोसले, लहू शिंदे, बबन तवर, आलिम मुलाणी हे नागेश्वर मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)