कुलस्वामिनी विंध्यवासिनी

आश्‍विन शु. 1 पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. हा देवीचा उत्सव. घरोघरी घट बसवून देवीची पूजा-अर्चा करतात. गावांमध्ये, शहरांमध्ये असलेल्या देवींच्या सर्व देवळातही हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. सर्वत्र मंगलमय वातावरण असते. आपल्याकडे प्रथम पूजेचा मान जसा गजाननाचा तसा देवींमध्ये प्रत्येकाच्या कुलस्वामिनीचा! प्रत्येक घराण्याची कुलस्वामिनी वेगळी असते. पण मंगलकार्यात तिचा मान प्रथम असतो. अशा मोने, चितले, दीक्षित आडनावाच्या कुलस्वामिनीची म्हणजे “विंध्यवासिनी’ देवीची माहिती आज आपण घेऊ.

श्री परशुरामाच्या नित्य वास्तव्याने पवित्र असलेल्या महेंद्र पर्वताच्या डोंगरपायथ्याशी अतिशय निसर्गरम्य परिसरात देवी विंध्यवासिनीचे मंदिर आहे. या भागाला रावतळे-चिपळूण असे म्हणतात. चिपळूणमध्ये गेल्यावर स्टॅन्डपासून अंदाजे 3 कि.मी. तर हाय-वेपासून अगदी जवळच मंदिराचा निसर्गरम्य परिसराचा रस्ता सुरू होतो. देऊळ अतिशय शांत परिसरात, कोलाहलापासून थोडेसेच दूर व फार गर्दी नसलेले असे आहे. त्यामुळे दर्शनासाठी कोठेही रांगेत उभे राहणे, पूजा ओटीसाठी हाका मारणारे दुकानदार, लाऊडस्पीकरवर लावलेली गाणी, गजबजाट असे इथे काहीही नाही. तुमची गाडी असेल तर पार देवळापर्यंत तुम्ही शांतपणे जाऊ शकता. 15-20 दगडी पायऱ्या आणि समोर वाहणारा धबधबा पाहत चढून गेलात की भव्य सभामंडपात देवीची मूर्ती समोरच विराजमान झालेली दिसते आणि मन प्रसन्न होते.

चंद्रवदन लव कमल मनोहर, दर्शनि होती श्रमपरिहार भक्तांवरती अभय वरद कर, भजता तुझिया टायी मम विंध्यवासिनी आई, तू दर्शन मजला देई- देवीच्या दर्शनाची ओढ घेऊन गेलेला भक्त खरोखरीच तिच्या दर्शनाने त्याचे श्रम विसरून जातो. आणि तिच्याकडे एकच मागणे मागतो. अभय वरद कर. हे विंध्यवासिनी माते तुझ्या दर्शनाने हा भवसागर मी तरुन जाईन असा विश्‍वास त्याच्या मनात जागृत होतो आणि भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारी ही देवी त्याला शुभाशिर्वाद देते. हे मंदिर इ.स.च्या आठव्या शतकापासून असावे व त्या विषयीच्या आणि इतरही काही आख्यायिका आहेत. परंतु, 1983 साली अतिवृष्टीमुळे देवळाजवळील दरडी कोसळल्या. परंतु, मूर्तीला काहीही झाले नाही. पुण्यातील प्रसिद्ध चितळे बंधू यांनी कुलस्वामिनी देवी असल्याने त्यांनी 1988 मध्ये मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कामी सहकार्य केले. गेली 500 वर्षे हा उत्सव चालू आहे.

पुरंदरादिसेदितां, पुरादिवंराखण्डनीम्‌।
विशुद्ध बुद्धिकारिणी, भजानि विद्यवासिनिय।।
हे विंध्यवासिनी माते या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आणि सदैवच तुझे स्मरण मला सतत असू देत ही तुझ्या चरणी प्रार्थना!

– आरती मोने


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)