कुलभूषणच्या फाशीच्या शिक्षेला निकाल येईपर्यंत स्थगिती

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभुषण जाधव यांना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा स्थगित करण्याचे आदेश आज आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिले. जाधव यांच्या संदर्भात सुनावणीसाठी प्रलंबित असलेल्या खटल्याची अंतिम सुनावणी होईपर्यंत जाधव यांना फाशी देण्यात येऊ नये, असे आदेश आज इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीसनी दिले. रोनी अब्राहम यांच्या अध्यक्षतेखालील “आयसीजे’च्या 11 सदस्यीय पिठाने एकमताने हा निकाल दिला.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी 1977 साले स्वीकारलेल्या व्हिएन्ना ठरावानुसार जाधव यांना भारताकडून कायदेशीर मदत दिली जावी. जाधव यांच्या संदर्भातील प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अधिकारकक्षेतच येत आहे. तर जाधव यांच्या अटकेच्यावेळच्या परिस्थितीबाबत काही वाद असल्याचेही “आयसीजे’ने स्पष्ट केले.
जाधव प्रकरणी भारत आणि पाकिस्तानने आपापली बाजू मांडल्याच्या तिसऱ्या दिवशी हा निकाल दिला गेला. जाधव इराणमधून पाकिस्तानात आल्यावर गेल्यावर्षी 3 मार्च रोजी बलुचिस्तानमध्ये त्यांना अटक करण्यात आली, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. तर भारतीय नौदलातून निवृत्त झाल्यावर व्यवसायासाठीए इराणमध्ये गेलेल्या जाधव यांचे तेथूनच अपहरण करून त्यांना पाकिस्तानात आणले गेले, असा भारताचा दावा आहे. जाधव यांच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवून पाकच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यामुळे दोन्ही देशांदरम्यान तणाव निर्माण झाला होता.
जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा ही व्हिएन्ना ठरावाचा भंग करणारी आहे. ही शिक्षा रद्द करण्यासाठी भारताने 8 मे रोजी “इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीस’मध्ये दावा दाखल केला होता.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)