कुरीयर कंपनी दरोडाप्रकरणी दोन संशयित ताब्यात

पुणे – कुरियर कंपनीच्या कार्यालयातील कामगारांना धारदार हत्यारे आणि पिस्तूलाचा धाक दाखवून तब्बल 31 लाखांच्या रोकडसह सव्वासात लाखांची स्कॉर्पिओ लांबविणाऱ्या दरोडयाचे महत्वाचे धागेदोरे पोलीसांच्या हाती लागले आहेत. या दरोडयाचा तपास करणाऱ्या पथकाने याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे, या प्रकरणाचा छडा येत्या दोन दिवसांतच लावून मुख्य आरोपींना गजाआड करण्याचा चंग शहर पोलीसांनी बांधला आहे. दरम्यान, पोलीस मुख्यालयाच्या समोरच हा प्रकार घडल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यामध्ये जातीने लक्ष घातले आहे. त्यासाठी पोलीसांची खास पथके तपासासाठी विविध भागात रवाना करण्यात आली आहेत. 24 ऑगस्ट रोजी पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास पोलीस मुख्यालयाच्या समोर ही घटना घडली होती.

याबाबतची हकिकत अशी, बुधवार पेठेतील मध्यवस्तीत या कुरियर कंपनीचे कार्यालय असून त्याचे मुख्य कार्यालय मुंबईत आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या काही भागात या कुरियर कंपनीच्या अन्य शाखा आहेत. या कार्यालयात जमा झालेली रक्कम पुण्यातील बुधवार पेठेतील मुख्य कार्यालयात आणली जाते. त्यानंतर ही रक्कम मुंबई येथील मुख्य कार्यालयात दर दोन ते तीन दिवसांत अथवा आठवडयाने मुंबईच्या मुख्य कार्यालयात पाठविली जाते. त्यानुसार या कार्यालयातील तीन कामगार आणि चालक हे 24 ऑगस्ट रोजी पहाटे चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास
कुरियर कंपनीच्या गाडीने मुंबईला निघाले होते, त्यांच्या या गाडीत सशस्र सुरक्षारक्षकही होता.

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या समोर असलेल्या एका पेट्रोलपंपावर या गाडीत डिझेल भरण्यात आले, पेट्रोल पंपावरुन ही गाडी निघाल्यानंतर पन्नास मीटर अंतरावर पोलीसांच्या वेषात आलेल्या सहा दरोडेखोरांनी कुरियर कंपनीच्या गाडीत बसलेल्या कामगारांना धारदार हत्यारे आणि पिस्तूलाचा धाक दाखवून गाडीचा ताबा मिळविला. त्यानंतर एका दरोडेखोराने या सर्व कामगारांचे अपहरण करत ही गाडी चालवित तळेगांव दाभाडे येथील शिक्रापूर रस्त्यावर नेली, या कामगारांना निर्जन ठिकाणी सोडून हे दरोडेखोर 31 लाख रुपयांची रोकड आणि सव्वासात लाख रुपयांची स्कॉर्पिओ असा 38 लाख 25 हजार रुपयांचा ऐवज घेऊन हे दरोडेखोर पसार झाले. याप्रकरणी प्रथम तळेगांव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यानंतर हा गुन्हा चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

पोलीस मुख्यालयाच्या समोरच आणि ते सुध्दा तोतया पोलीसांनी हा दरोडा टाकल्याने शहरातील सुरक्षेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते, या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन या तपासाचे आदेश दिले होते. त्यासाठी चतु:श्रुंगी पोलीसांसह गुन्हे शाखेची आणि पोलीसांची अन्य पथके या प्रकरणाचा तपास करत होते. मात्र, पाच ते सहा दिवसांचा कालावधी उलटूनही त्याचा तपास लागत नसल्याने पोलीसांवर सर्व स्तरातून टीका होत आहे. परंतु या दरोडयाचे महत्वाचे धागेदोरे पोलीसांच्या हाती लागले असून तपासातील एका पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे, त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांतच या प्रकरणाचा छडा लावण्यात यश येइल असा दावा पोलीस सूत्रांनी ” प्रभात’ शी बोलताना केला.

” अभ्यास’ करुनच साधला असावा डाव…!
गेल्या काही वर्षांपासून या कंपनीचे कार्यालय बुधवार पेठेच्या परिसरात आहे, या कुरियर कंपनीची दर दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल आहे. या माध्यमातून आलेली रक्कम सुरक्षित राहावी आणि मुख्य कार्यालयात सुरक्षितपणे पोचावी यासाठी कंपनीच्या वतीने विशेष दक्षता घेण्यात येत असते. त्यासाठीच आणि वाहतूक कोंडीत अडकू नये म्हणून दरवेळी ही रोकड पहाटेच्या सुमारासच मुंबईला पाठविण्यात येते, याची इंत्यभूत माहिती असणाऱ्यानेच हा डाव साधला असावा तसेच त्यासाठी या दरोडेखोरांनी पूर्ण ” अभ्यास’ करुनच हा दरोडा टाकला असण्याची शक्‍यता आहे. त्याशिवाय या कार्यालयातील कोण कर्मचारी अथवा त्याची माहिती असणारा कोणी यामध्ये सामील आहे का याची पोलीसांच्या वतीने कसून तपासणी करण्यात येत आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)