कुरिअरच्या पार्सलमधून क्रूड बॉम्बचा स्फोट

तीन जण गंभीर जखमी 


पार्सल देणाऱ्याचे रेखाचित्र तयार


पुण्यातील सरहद्द संस्थेचे संजय नहार यांच्या नावाचे होते पार्सल

नगर- नगर शहरातील माळीवाडा परिसरातील ढोरगल्लीत असलेल्या मारुती कुरिअर कार्यालयातील पार्सलमध्ये मंगळवारी रात्री 10.15 च्या सुमारास झालेल्या स्फोटात तीन जण जखमी झाले आहेत. कुरिअर मालक सत्यजित भुजबळ (वय 39, रा. भिंगार), कामगार संजय क्षीरसागर (वय 25) आणि आणखी एकजण जखमी झाला आहे. यामधील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कंपनीचे कर्मचारी एक पार्सल सोडत होते. याचवेळी अचानक स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, दुकानाच्या पायऱ्यांवर रक्ताचा सडा पडला होता. जखमी तिघांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. कोतवाली पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. बॉम्बशोधक व निकामी पथकाकडून हा स्फोट नेमका कशामुळे झाला याची तपासणी सुरू आहे. स्फोटानंतर परिसरातील रहिवाशांनी घटनास्थळी गर्दी केली. अचानक झालेल्या या स्फोटाने नगर शहरात एकच खळबळ उडाली आहे. स्फोट झालेल्या पार्सलमध्ये नेमके काय होते याचा बॉम्बशोधक पथकाकडून शोध सुरू आहे. या घटनेनंतर पोलिसांच्या चौकशीत कुरिअरमधील पार्सल सावेडीतून आलेले होते.

पुणे येथे सामाजिक संस्था चालविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या नावे हे पार्सल पाठविण्यात आले होते. पार्सल ज्या पत्त्यावरून पाठविण्यात आले होते तो पत्ता चुकीचा असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मात्र, हे पार्सल दुकानातील कर्मचारी का फोडून पाहत होते, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा बॉम्बस्फोट असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा कोतवाली पोलिसांसह दहशतवादी विरोधी पथक तपास करत आहेत.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी घटनास्थळाला भेट दिली.

याशिवाय फॉरेन्सिक टीमकडून कार्यालयाची तपासणी सुरू आहे. अद्यापि स्फोट नेमका कशाचा व कशामुळे झाला याची माहिती अद्यापपर्यंत समोर आली नाही. कुरिअरवर पुणे येथील सरहद संस्थेचे संजय नहार यांना नगर येथील सावेडीतून पाठविण्यात आले होते. मात्र, सावेडीतील पत्ता चुकीचा असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

झालेला स्फोट हा क्रूड बॉम्बचा (हाताने बनविलेला बॉम्ब) असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पार्सलमध्ये एक रेडिओ होता. रेडिओचे बटन त्यांनी ऑन करताच स्फोट झाल्याचे चौबे यांनी सांगितले.

पार्सलवर चिठ्ठी
त्या पार्सलवर एक चिठ्ठी होती. ही चिठ्ठी एका मुलीने लिहिलेली होती. “मी पुणे येथे कॉलेजला असताना आपण मला खूप मदत केली. त्यामुळे आपणास भेट म्हणून मी हे पार्सल पाठवत आहे’ असे या चिठ्ठीत लिहिले होते. ही चिठ्ठी वाचल्यानंतर संजय क्षीरसागर यांनी हे पार्सल उघडून पाहिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)