कुरकुंभ परिसरात प्रदुषणाचा कहर

वासुंदे- दौंड तालुक्‍यात कायमच दुर्घटना व प्रदुषणासाठी चर्चेत असणारी कुरकूंभ औद्योगिक वसाहतीने पुन्हा एकदा वाढत्या प्रदुषणाने डोकं वर काढायला सुरवात केली आहे. काही कंपनीच्या प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी संबंधित कंपन्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मागील काही महिन्यांत मेल्झर केमिकल प्रा. लि. या कंपनीने 19 जुन रोजी सकाळी उत्पादन प्रक्रिया चालु असताना रियाक्‍टरमध्ये मोठा बिघाड झाल्यामुळे केमिकल सांडले होते. त्यामुळे अतिघातक केमिकल हवेच्या सान्निध्यात आल्याने विषारी वायु तयार झाला होता आणि या वायुचे लोट परिसरात वाहु लागल्याने नागरिकांना श्‍वास घेण्यास त्रास होउ लागला. तसेच डोळ्यांची चुणचुण व डोके दुखीचा त्रास होत होता. या कंपनीच्या जवळपास असणाऱ्या इतर कंपन्यांमधील कामगारांनी भीतीपोटी पळ काढला होता.
याच औद्योगिक वसाहतीत 8 जुन रोजी हारमोनी ऑरगॅनिक प्रा. लि या केमिकल कंपनीतून अशाच प्रकारची घटना घडल्यामुळे विषारी वायुची गळती झाली होती. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. प्रशासनाद्वारे याकडे दुर्लक्ष केले जाते. मोठी दुर्घटना घडल्यावर प्रशासनाला जाग येईल. मात्र, तोपर्यत नागरिकांना कायमच जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. प्रशासनाने कडक कारवाई करुन सर्व कंपन्यांना नियमानुसार उत्पादन करण्यास अनिवार्य करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
कुरकूंभ, पांढरेवाडी, जिरेगाव, मुकादमवाडी परिसरात अशा घटनेची माहिती पसरताच नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण होते. प्रदुषणाच्या अतिजास्त प्रमाणामुळे कुरकुंभ परिसरातून इतरत्र वास्तव्य करित आहेत. अशा घटनांची कारणे स्थानिक नागरिकांना समजु शकत नाहीत. परंतु, उत्पादन प्रक्रियेतील जबाबदार अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे अशा घटना घडत आहेत. कंपनीतील काही अधिकाऱ्यांकडून चुकीचे निर्णय घेतल्यामुळे अशा घटना घडत असल्याची कूजबुज ऐकायला मिळत आहे.
घटनेची कारणे काहीही असो परंतु यामुळे नागरिकांचा नाहक बळी गेल्याशिवाय राहणार नाही. यामुळे उद्योग निरिक्षकांनी यावर नियंत्रण ठेवुन संबंधित जबाबदार अधिकारी व मालक यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. परंतु, प्रशासनाचे याकडे जाणुनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)