कुरकुंभ परिसरात टॅंकरही अपुरे

दुष्काळाच्या तीव्र ः पाण्याअभावी रब्बी हंगामही मातीत

कुरकुंभ- दौंड तालुक्‍यातील कुरकुंभ, मळद, जीरेगाव, कौठडी, लाळगेवाडी, भोळोबावाडी येथे पावसाअभावी यंदाचा खरीप आणि रब्बी दोन्ही हंगाम मातीत गेल्याने येथील शेती पडीक झाली आहे. या गंभीर समस्येमुळे या परिसरात पिण्याच्या पाण्याचा, तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावू लागला असून असल्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शेतकरी हतबल झाला आहे.

सरकारने दौंड तालुक्‍यातील काही भागात दुष्काळजन्य परिस्थिती जाहीर केली होती. याबाबत प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचा टॅंकर काही भागात सुरूही केला. जीरेगाव भागात थोड्या फार प्रमाणतच पाणी प्रश्न मिटल्याने येथील काहीं स्थानिकांनी पुढे येत स्वखर्चातून पिण्याच्या पाण्याचा टॅंकर सुरू केला आहे. दुष्काळी उपाययोजना करण्यात सरकार म्हणावे तसे सहकार्य करीत नसल्याने या स्थानिक पातळीवरच्या उपाययोजना अपुऱ्याच पडत आहेत. मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच पाण्याचे स्रोत आटल्याने आणखी येत्या दोन महिन्यात भयावह स्थिती निर्माण होणार आहे. या भागातील तलाव, बंधारे, कोरडे पडून विहिरी आणि कूपनलिकांनी तळ गाठला आहे.

  • रस्त्यावरच पाण्याच्या भांड्यांची रांग
    जीरेगाव परिसरात स्वखर्चातून पाण्याचा टॅंकर उपलब्ध केला असला तरी या भागात हे पाणी मिळवण्यासाठी देखील शेतकऱ्यांना जीवाची धडपड करताना पाहायला मिळत आहे. टॅंकर गावात येण्याआधीच अगोदरच गावात रस्त्याच्या कडेला पाणी साठवणुकीची भांडी ठेवावी लागत आहेत.
  • उजाड माळरानावर जनावरे शोधताहेत चारा
    शेतीच्या, पिण्याच्या पाण्याबरोबरच येथील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात भेडसावू लागला आहे. जनावरांचे चाऱ्यावाचून हाल होत असून तीव्र उन्हातही बकऱ्या, मेंढ्या उजाड माळरानावर चारा शोधत आहे.
  • गेल्या तीन वर्षांतील टॅंकरची स्थिती
    दौंड तालुक्‍यात 2016-17, 2017-18, 2018-19 मध्ये टॅंकरने पाणी पुरवठा केलेल्या गावांची यादी पुढीलप्रमाणे – 2016-17 गावे – हिंगणीगाडा, ताम्हणवडी, वासुंदे, कौठडी, जिरेगाव. 2017-18 गावे – ताम्हणवाडी. 2018-19 गावे – ताम्हणवाडी, पडवी, पांढरेवाडी, रोटी, वासुंदे, खोर, जिरेगाव, हिंगणीगाडा (20 जानेवारी 2019 पासून बंद), स्वामी चिंचोली, देऊळगाव गाडा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)