कुमार विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धा; भारताच्या इलॅवेनिल वॅलरिवनला विश्‍वविक्रमासह सुवर्णपदक

सिडनी – भारताचा गुणवान युवा नेमबाज इलॅवेनिल वॅलरिवन हिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारांत विश्‍वविक्रमी कामगिरीची नोंद करताना सुवर्णपदक पटकावून कुमार विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धेचा पहिला दिवस गाजविला.
केवळ 18 वर्षे वयाच्या इलॅवेनिलने आपल्या छोट्या कारकिर्दीतील केवळ दुसऱ्या विश्‍वचषक स्पर्धेत सहभागी होताना पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली होती. परंतु त्याचे अजिबात दडपण न घेता तिने अंतिम फेरीत 249.8 गुणांची कमाई करताना सुवर्णपदकाची निश्‍चिती केली.

त्यानंतर मोसमातील या पहिल्याच कुमारांच्या विश्‍वचषक स्पर्धेत श्रेया आगरवाल व झीना खिट्टा यांच्या साथीत सांघिक सुवर्णपदकही जिंकताना इलॅवेनिलने सलामीलाच दुहेरी मुकुटाची नोंद केली. त्याआधी इलॅवेनिलने प्राथमिक फेरीत 631.4 गुणांची नोंद करताना विश्‍वविक्रमाशी बरोबरी साधली होती. शेवटून दुसऱ्या फेरीत 9.6 अशा गुणांची नोंद केल्यानंतर निर्णायक 24व्या संधीला 10.7 गुणांची जबरदस्त कामगिरी करणाऱ्या इलॅवेनिलने तैपेई चीनच्या लिन यिंग शिन हिला दुसऱ्या क्रमांकावर फेकले. इलॅवेनिलने गेल्याच आठवड्यांत जागतिक नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.

भारताच्या अर्जुन बाबुताने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारांत कांस्यपदकाची कमाई करताना विश्‍वचषक स्पर्धेतील आपल्या दुसऱ्या सुवर्णाची नोंद केली. बाबुताने याआधी गेल्या वर्षी जपानमधील वॅको येथे झालेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर रायफल प्रकारांत रौप्यपदक पटकावले होते. या वेळी मात्र त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

बाबुताने 226.3 गुणांची नोंद करताना तिसऱ्या स्थानाची निश्‍चिती केली. चीनच्या युकी लियूने 247.1 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. तर हंगेरीच्या झालन पेकलरने 246 गुणांची नोंद करताना रौप्यपदकाची निश्‍चिती केली. या प्रकारातील अन्य भारतीय स्पर्धकांपैकी सूर्य प्रताप सिंगला सहाव्या, तसेच शाहू तुषार मानेला आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

   गगन नारंगकडून इलॅवेनिलचे कौतुक

इलॅवेनिल ही मूळची गुजरात येथील असून ती पुण्यात गन फॉर ग्लोरी अकादमीच्या प्रोजेक्‍ट लीप या उपक्रमाअंतर्गत नेमबाजीचे प्रशिक्षण घेते. तिच्यासह सांघिक सुवर्ण पटकावणारी श्रेया अगरवाल हीदेखील गन फॉर ग्लोरीच्या जबलपूर शाखेत प्रशिक्षण घेते. गेल्या काही महिन्यांपासून नेमबाजीचा केलेला सराव आणि मेहनतीच्या जोरावर हे यश अपेक्षित होते, अशी भावना इलॅवेनिल हिने व्यक्‍त केली. ती म्हणाली की, या यशाचे श्रेय माझे आई-वडील आणि ‘गन फॉर ग्लोरी’मधील माझ्या प्रशिक्षकांना जाते. गगन नारंग स्पोर्टस फाऊंडेशनचे सहसंस्थापक गगन नारंग यांचे मी विशेष आभार मानू इच्छिते.
इलॅवेनिलमध्ये जागतिक स्तरावरील विक्रम प्रस्थापित करण्याची क्षमता आधीपासूनच होती.

या स्पर्धेतील यशामुळे ती पुन्हा एकदा अधोरेखित झाली. यापुढेही ती हा लौकिक कायम ठेवेल याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे, असे प्रशंसोद्‌गार गन फॉर ग्लोरी अकादमीचे सहसंस्थापक गगन नारंग यांनी काढले आहेत. संस्थेचे सहसंस्थापक पवन सिंग म्हणाले की, आम्ही सुरू केलेला प्रोजेक्‍ट लीप हा प्रशिक्षण उपक्रम योग्य दिशेने सुरू आहे याचे हे द्योतक म्हणायला हवे. भविष्यात नेमबाजीत अधिकाधिक उत्तम कामगिरी होण्याच्या दृष्टीने हा उपक्रम निश्‍चत फलदायी ठरेल. ऑलिंपिक गोल्ड क्‍वेस्ट आणि डॉ. लाल पॅथलॅब यांचे या प्रशिक्षण उपक्रमास सहकार्य लाभले अहे. हा एक स्कॉलरशिप बेस्ड उपक्रम असून त्यात सहभागी होण्यासाठी नेमबाजांना कठीण चाचण्या पार कराव्या लागतात. त्याअंतर्गत गुणवान नेमबाजांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेण्याची संधी प्राप्त होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)