कुमारांची विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धा; मुस्कान भानवालाचा दुहेरी सुवर्णवेध

   भारत गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर, चीन अग्रस्थानी

सिडनी – भारताची केवळ 16 वर्षीय नेमबाज मुस्कान भानवालाने महिलांच्या 25 मीटर पिस्तोल प्रकारात चीन व थायलंडच्या अव्वल प्रतिस्पर्ध्यांना चकित करीत सुवर्णपदकाला गवसणी घालताना येथे सुरू असलेल्या कुमारांच्या विश्‍वचषक स्पर्धेचा अखेरचा दिवस गाजविला. तसेच मुस्कानने मनू भाकर व देवांशी राणाच्या साथीत महिलांच्या 25 मीटर पिस्तोल सांघिक प्रकारातही भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून देत दुहेरी मुकुट पटकावला. विश्‍वचषक स्पर्धेत मुस्कानचे हे पहिलेच सुवर्ण ठरले.

मुस्कानमुळे भारताने या स्पर्धेतील चौथे वैयक्‍तिक सुवर्णपदकही जिंकले. मुस्कानच्या या जबरदस्त कामगिरीमुळे भारताने चीनशी सुवर्णपदकांच्या संख्येत बरोबरी साधताना गुणतालिकेत दुसऱ्या स्थानाची निश्‍चिती केली. भारताने या स्पर्धेत नऊ सुवर्ण, पाच रौप्य व आठ कांस्य अशा एकूण 22 पदकांची कमाई केली. नेमबाजीतील महासत्ता मानल्या जाणाऱ्या चीनने 9 सुवर्णांसह एकूण 24 पदके पटकावीत गुणतालिकेत पहिले स्थान राखले. इटली व ऑस्ट्रेलिया हे आघाडीवरील देश अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर राहिले.

मुस्कान भानवालाने महिलांच्या 25 मीटर पिस्तोल प्रकारात सर्वोत्तम कामगिरी केल्यामुळे चीनच्या क्‍विन सिहांगसह थायलंडच्या कन्याकोर्न हिरुनफोएमला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मुस्कानने सहाव्या फेरीत परफेक्‍ट-5 लक्ष्यवेध करताना चीनच्या क्‍विन सिहांगवर 3 गुणांची आघाडी घेतली. त्यानंतर अंतिम फेरीत 35 लक्ष्यांचा वेध घेत मुस्कानने सुवर्णपदकाची निश्‍चिती केली. 34 लक्ष्यांचा वेध घेणाऱ्या चीनच्या क्‍विन सिहांगने रौप्यपदक जिंकले. तसेच 26 लक्ष्यांचा वेध घेणाऱ्या थायलंडच्या कन्याकोर्न हिरुनफोएमला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताची मनू भाकर चौथ्या क्रमांकावर राहिली.

तत्पूर्वी मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारात वैयक्‍तिक सुवर्णपदक जिंकले. तसेच तिने देवांशी राणा व महिमा आगरवाल यांच्या साथीत भारताला याच प्रकारातील सांघिक सुवर्णपदकही जिंकून दिले. त्याचप्रमाणे भारताची षोडशवर्षीय नेमबाज इलॅवेनिल वॅलरिवन हिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारांत विश्‍वविक्रमी कामगिरीसह दुहेरी मुकुटाचीही कमाई केली आहे. त्यानंतर अनिश भानवालाने पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तोल प्रकारात वैयक्‍तिक सुवर्णपदक पटकावताना भारताला सांघिक स्पर्धेत रौप्यपदकही मिळवून दिले. तसेच मनू भाकर आणि अनमोल या भारतीय जोडीने 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारातील मिश्र दुहेरीत पात्रता पेरीत विश्‍वविक्रमी कामगिरीची नोंद केल्यावर सुवर्णपदकालाच गवसणी घातली.

सांघिक स्पर्धेत दुहेरी यश

महिलांच्या 25 मीटर पिस्तोल प्रकारातील सांघिक स्पर्धेत भारतीय संघांनी दुहेरी यश मिळविले. मुस्कान भानवाला, मनू भाकर व देवांशी राणा यांच्या भारतीय महिला संघाने वैयक्‍तिक स्पर्धेतील सोनेरी यशाची पुनरावृत्ती करताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर महिला गौर, तुऱ्ही आगरवाल व तनू रावल यांचा समावेश असलेल्या दुसऱ्या भारतीय संघाने रौप्यपदकाची निश्‍चिती केली. हिरुफोएम, विरामोन किदार्न व एस. सक्‍ससिगा यांचा समावेश असलेल्या थायलंड संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ज्युनियर पुरुषांच्या स्कीट नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अनंतजीत सिंग नारुका, आयुष रुद्रराजू व गुर्निलाल सिंग यांच्या संघाने 348 गुणांची नोंद करताना रौप्यपदकाची निश्‍चिती केली. वैयक्‍तिक स्कीट स्पर्धेत नारुकाला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)