कुमारांची विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धा : गुणतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर

 अनिश भानवालामुळे भारताला तिसरे वैयक्‍तिक सुवर्ण

सिडनी – भारताचा गुणवान उदयोन्मुख नेमबाज अनिश भानवालाने पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तोल प्रकारात सुवर्णपदक पटकावताना येथे सुरू असलेल्या कुमारांच्या विश्‍वचषक स्पर्धेचा आजचा दिवस गाजविला. सांघिक स्पर्धेत चीनने सुवर्णपदक जिंकले असले, तरी रौप्य व कांस्यपदके भारतीय नेमबाजांनीच जिंकली.

केवळ 15 वर्षे वयाच्या अनिशच्या या कामगिरीमुळे भारताला या स्पर्धेत एकूण सहावे व वैयक्‍तिक तिसरे सुवर्णपदक मिळविता आले. तसेच एकूण सहा सुवर्ण, तीन रौप्य व सहा कांस्य अशा एकूण 15 पदकांच्या कमाईमुळे भारतीय संघाने या स्पर्धेच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. चीनने गुणतालिकेतील अग्रस्थान राखले असून इटली व ऑस्ट्रेलिया हे नेमबाजीतील अग्रगण्य देश अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत.

अनिशने पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तोल प्रकारातील पात्रता फेरीत 585 गुणांची नोंद करताना सर्वोच्च कामगिरीसह अंतिम फेरी गाठली. त्यानंतर अत्यंत चुरशीच्या अंतिम लढतीत 29 लक्ष्यांचा वेध घेताना त्याने अन्हाद जावांडा आणि राजकंवरसिंग संधू या भारतीयांसह तीन चिनी प्रतिस्पर्ध्यांना पाणी पाजले व वैयक्‍तिक सुवर्णपदकाला गवसणी घातली. चीनच्या चेंग झिपेंगने 27 लक्ष्यांचा वेध घेत रौप्यपदकाची निश्‍चिती केली.

पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तोल प्रकारातील सांघिक स्पर्धेत मात्र चीनने 1733 गुणांसह सुवर्णपदक पटकावले. तर अनिश भानवाला, अन्हाद जावांडा व आदर्श सिंग यांनी रौप्यपदकाची निश्‍चिती केली. विशेष म्हणजे राजकंवरसिंग संधू, जपत्येश सिंग जसपाल व मनदीप सिंग यांच्या संघाने कांस्यपदक जिंकून भारताला दुहेरी यश मिळवून दिले.

त्याआधी या स्पर्धेत भारताची आणखी एक सनसनाटी नेमबाज मनू भाकरने त्या कामगिरीची पुनरावृत्ती करताना आपल्या देशाची मान उंचावली. मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारात वैयक्‍तिक सुवर्णपदक जिंकले. तसेच तिने देवांशी राणा व महिमा आगरवाल यांच्या साथीत भारताला याच प्रकारातील सांघिक सुवर्णपदकही जिंकून दिले. त्याचप्रमाणे भारताची षोडशवर्षीय नेमबाज इलॅवेनिल वॅलरिवन हिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारांत विश्‍वविक्रमी कामगिरीसह दुहेरी मुकुटाचीही कमाई केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)