कुमारांची विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धा; मनू भाकरची पुन्हा दुहेरी सुवर्णाची कमाई

सिडनी  – भारताची गुणवान युवा नेमबाज व काही दिवसांपूर्वीच मेक्‍सिको विश्‍वचषक स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावून सनसनाटी कामगिरी करणाऱ्या मनू भाकरने येथे सुरू असलेल्या कुमारांच्या विश्‍वचषक स्पर्धेत त्या कामगिरीची पुनरावृत्ती करताना आपल्या देशाची मान उंचावली. मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारात वैयक्‍तिक सुवर्णपदक जिंकले.

तसेच तिने देवांशी राणा व महिमा आगरवाल यांच्या साथीत भारताला याच प्रकारातील सांघिक सुवर्णपदकही जिंकून दिले. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत 5 सुवर्णपदकांसह 11 पदके जिंकली असून त्यात पाच सुवर्णपदकांचा समावेश आहे. भारताची षोडशवर्षीय नेमबाज इलॅवेनिल वॅलरिवन हिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारांत विश्‍वविक्रमी कामगिरीसह दुहेरी मुकुटाचीही कमाई केली होती. तसेच विवान कपूरने पुरुषांच्या ट्रॅप प्रकारांत कांस्यपदक पटकावले होते.

केवळ 16 वर्षे वयाच्या मनू भाकरने मेक्‍सिको येथे वरिष्ठ विश्‍वचषक स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकून खळबळजनक कामगिरी केली होती. आज अत्यंत चुरशीच्या अंतिम फेरीत थायलंडच्या कान्याकॉर्न हिरुनफोएम हिची कडवी झुंज मोडून काढताना मनू भाकरने 235.9 गुणांसह 10 मी. एअर पिस्तोल प्रकारात सुवर्णाची निश्‍चिती केली. कान्याकॉर्नने 234.9 गुणांसह रौप्यपदक पटकावले, तर चीनच्या काईमान लु हिला 214.2 गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताची देवांशी राणा 195.3 गुणांसह चौथ्या क्रमांकावर राहिली.

त्याआधी मनू भाकर व कान्याकॉर्न हिरुनफोएम यांच्यातील चुरस चांगलीच रंगली होती. केवळ सहा संधी बाकी असताना मनू भाकरने अखरेच्या दोन संधींना 9.6 व 9.8 गुणांची नोंद करीत सुवर्णपदकाची निश्‍चिती केली. सांघिक स्पर्धेत मनू भाकर, देवांशी राणा व महिमा यांच्या भारतीय संघाने सुवर्णपदक पटकावल्याने झियाव, लु आणि लि शु यांचा समावेश असलेल्या चीनच्या महिलांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तर हिरुनफोएम, लक्‍ससिगा व वारुण्यफान कायवंगोएन यांचा समावेश असलेल्या थायलंड महिला संघाने कांस्यपदकाची कमाई केली.

 गौरवला रौप्य, अनमोलला कांस्य

पुरुषांच्या नेमबाजीतही भारतीयांनी आपला ठसा उमटविलाच. पुरुषांच्या 10 मीटर एअर प्रकारांत भारताच्या गौरव राणाने 233.9 गुणांची नोंद करूनही त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. चीनच्या झोहाव वांगने 242.5 गुणांची कमाई करताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर अनमोल जैनने 215.1 गुणांसह कांस्यपदकाची निश्‍चिती केली. तसेच अर्जुन सिंग चीमा (152.7), अन्द जावांदा (134.4) आणि अभिषेक आर्य (114.5) यांनी अनुक्रमे सहावा, सातवा व आठवा क्रमांक मिळविताना भारतीयांचे वर्चस्व कायम राखले. वैयक्‍तिक स्पर्धेत केवळ सहा संधी बाकी असताना गौरव राणा व वांग 2.3 गुणांसह बरोबरीत होते. परंतु अखेरच्या क्षणी वांगने 10.7 व 10.6 असे गुण मिळविताना बाजी मारली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)