कुत्र्यांच्या मारामारीत साईभक्तांची पळापळ

शिर्डी – भटक्‍या कुत्र्यांच्या जंगी मारामारीत साईभक्त अबाल वृध्दांची पळापळ झाल्याच्या घटना साईबाबा संस्थानच्या मंदिर परिसरात काही नवीन नाही. असे असताना मंगळवारी मध्यान्ह आरतीपुर्वी गुरुस्थान शेजारी गांवगेटजवळील मंदिर परिसरातील मोकाट कुत्र्यांचा आणि बाहेरून आलेल्या कुत्र्यांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला होता. यावेळी आरतीसाठी बसलेल्या भाविकांना भितीपोटी पळापळ करावे लागल्याने भाविकांनी मंदिर प्रशासनावर टिकेची झोड उडवली.
या कुत्र्यांचा धसका याठिकाणी असलेल्या लहान मुलांनेही घेतल्याने मंदीर परिसरात वावर असणाऱ्या असंख्य कुत्र्यांवर प्रश्‍नचिन्ह उद्भवले जात आहेत. साईमंदिर परिसरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांचा वावर वाढत असून साईभक्तांच्या जिवास भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो असे मत प्राणीमित्र यांनी व्यक्त केले.साईमंदिरातील गुरुस्थान, द्वारकामाई, चावडी, नंदादीप, संग्रहालय, बेबी फीडींग कक्ष, लेंडी बाग या वर्दळीच्या ठिकाणी
पिसाळलेल्या त्याचप्रमाणे मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या मोकाट कुत्र्यांना श्रद्धेचा भाग म्हणून भाविक आपल्या जवळ असलेले बिस्कीटे, दुध आदी घटक पदार्थ खाण्यास देतात. यामुुुळे मंदिरात कुत्र्यांचा हैदोस वाढला असून मंदिर परिसरात घाण करत असल्याचे स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सांगितले.
या कुत्र्यांना कोणत्याही प्रकारचे लसीकरण केलेले नाही. त्यामुळे एखाद्या भक्तास चावा घेतल्यानंतर प्रशासन जबाबदार राहणार का? असा सवाल वृद्ध भाविक करु लागले आहे. बेबी फिडींग कक्षात अंथरलेल्या गाद्यांवर हे कुत्रे सातत्यांने झोपलेले असल्यामुळे दुर्गेंधी पसरली आहे तसेच महिलांना स्तनपानासाठी जाण्यास भिती वाटते. दर्शन रांगेतून पुढे चालत असतांना मुख्य मंदीरात सर्रासपणे कुत्रे झोपलेल्या अवस्थेत असतात.
त्यावर एखाद्याचा पाय पडला तर मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे भक्तांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. शहरात मोकाट कुत्र्यांनी बऱ्याच लोकांना चावा घेतल्याचे उदाहरण डोळ्यासमोर असताना साईबाबा संस्थान प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे यातून उघड झाले आहे. यावर नगरपंचायत प्रशासन आणि संस्थान काय कारवाई करतात याकडे शिर्डी ग्रामस्थ व साईभक्तांचे लक्ष लागून आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)