कुत्रा चावला तर (भाग ३)

डॉ. जयदीप महाजन 
पिसाळलेले कुत्रे चावल्यावर होणारा आजार हा एक प्रकारच्या विषाणूमुळे होतो. हे विषाणू सुळे असलेल्या प्राण्यांमध्ये (म्हणजे कुत्री, कोल्हे, मांजरे, लांडगे, इ.) असाच रोग निर्माण करतात. जंगलातल्या या रोगाचा प्रसार भटक्‍या कुत्र्यांमार्फत मनुष्यवस्तीत होत असतो. हा आजार एकदा झाल्यावर यातून जगणे अशक्‍य असते. म्हणूनच कुत्रे चावल्यावर लोकांना एक विलक्षण भीती वाटत असते. 
पिसाळीचे उपचार आता नव्या चांगल्या लसींमुळे बदलले आहेत. या लसी अधिक परिणामकारक आहेतच पण त्यातले मृत विषाणू असल्याने त्यापासून मेंदूज्वराचा धोका शून्य असतो. मानवी पेशी, व्हेरोवॅब, आणि बदकाच्या गर्भापासून केलेली अशा या तीन प्रकारच्या लसी आहेत. यात मृत विषाणू वापरलेले असतात. तीन नव्या लसी बाजारात मिळतात. मानवी पेशीपासून केलेली लस चांगलीच महाग आहे. कोंबडीच्या गर्भपेशींपासून केलेली लस त्यामानाने स्वस्त आहे. व्हेरो प्रकारची लस जवळपास याच किमतीस मिळते. डोस खालीलप्रमाणे.
चावल्यानंतरचा उपचार जखमेचा प्रथमोपचार केला नसल्यास आधी जखम साबणपाण्याने स्वच्छ धुतली जाते. साबणपाण्यानंतर प्रोव्हीडोन आयोडीन किंवा 70% स्पिरीटने जखम धुवावी. जखमेच्या आतपर्यंत औषधी द्रव्ये पोचणे आवश्‍यक आहे. यानंतर पिसाळी विषाणू विरुद्ध ऍटीसिरम त्या जागी टोचावे लागते. यामुळे जागच्या जागी विषाणू मरतात. या उपचाराने विषाणूंची संख्या खूप कमी होते. हे एँटीसिरम उरल्यास स्नायूंमध्ये इंजेक्‍शन स्वरूपात देऊन टाकतात. म्हणजे ते रक्‍तात शिरून जखमेच्या जागी आतपर्यंत पोचू शकते. या प्रथमोपचाराने पिसाळीचा धोका 50% पासून 5% पर्यंत म्हणजे दहापट कमी होतो.
एकदा विषाणू चेतातंतूत शिरले की त्यावर हे एँटीसिरम काम करू शकत नाही. विषाणू रक्तात उघडे आहेत तोपर्यंतच याचा उपयोग असतो. यानंतर पिसाळीची लस टोचली जाते. हल्ली सर्व शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये पिसाळीची आधुनिक लस उपलब्ध आहे. ही लस आतापर्यंत स्नायूंमध्ये टोचली जात असे. आता 0.2 मि.ली (एक मिलीचा पाचवा हिस्सा) दंडाच्या कातडीत टोचला की पुरते. याप्रमाणे इंजेक्‍शनची एक कुपी पाच जणांसाठी वापरता येते. यामुळे खर्च खूप वाचतो. एक पूर्ण लसीकरण व्हायला 5 इंजेक्‍शने दिली जातात. 1 मिलीचे इंजेक्‍शन दंडावर/कमरेवर. 0,3,7,14,30 या दिवसांना एकेक इंजेक्‍शन याप्रमाणे (0 म्हणजे चावल्याचा किंवा पहिल्या इंजेक्‍शनचा दिवस).
हे लसीकरण पुढे प्रतिबंधक तर आतासाठी उपचार म्हणून उपयोगी असते. याच्यापासून ताबडतोब प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि मेंदूत विषाणू पोचायच्या आधी ती विषाणूंचा सामना करते. याचा परिणाम सहा महिने टिकतो. हे इंजेक्‍शन ढुंगणावर कधीही द्यायचे नसते. ते दंडावर दिले जाते. लहान मुलांना मात्र मांडीच्या बाहेरच्या भागात दिले जाते. पाळीव कुत्रा चावल्यास सहसा पिसाळीचा धोका नसतो. 10 दिवस कुत्र्याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. मात्र कुत्रे पिसाळल्याची शंका असल्यास लस टोचून घ्यावी. या आजारात लस टोचणी हीच मुख्य उपचार पद्धत म्हणून वापरली जाते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
34 :thumbsup:
34 :heart:
0 :joy:
34 :heart_eyes:
8 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)