कुत्रा चावला तर (भाग १)

डॉ. जयदीप महाजन 
पिसाळलेले कुत्रे चावल्यावर होणारा आजार हा एक प्रकारच्या विषाणूमुळे होतो. हे विषाणू सुळे असलेल्या प्राण्यांमध्ये (म्हणजे कुत्री, कोल्हे, मांजरे, लांडगे, इ.) असाच रोग निर्माण करतात. जंगलातल्या या रोगाचा प्रसार भटक्‍या कुत्र्यांमार्फत मनुष्यवस्तीत होत असतो. हा आजार एकदा झाल्यावर यातून जगणे अशक्‍य असते. म्हणूनच कुत्रे चावल्यावर लोकांना एक विलक्षण भीती वाटत असते. 
पिसाळी रोग झालेल्या कुत्र्या किंवा प्राण्यामार्फतच माणसाला हा आजार होऊ शकतो. म्हणूनच कुत्रे चावल्याच्या घटना खूप घडत असल्या तरी त्यातल्या एखाद्यालाच खरा धोका असतो. दरवर्षी भारतात कुत्रे चावण्याच्या लाखो घटना होतात. यापैकी सुमारे 50 हजार जण मरण पावतात. हे दु:खद सत्य आहे. रोग कसा होतो कोणत्याही जखमेवर विषाणूयुक्त लाळ सांडली की लागण होते. त्वचेवर जखम असल्यास विषाणू प्रवेश करू शकत नाहीत. या आजाराचे विषाणू चेतातंतूतून पसरतात.
पिसाळी रोग झालेल्या कुत्र्याच्या (किंवा प्राण्यांच्या) लाळेमध्ये हे विषाणू असतात. लाळेमध्ये विषाणू उतरल्यावर साधारणपणे दहा दिवसांत तो प्राणी मरतो. कुत्रा चावल्यानंतर हे विषाणू जखमेत पसरतात. त्यानंतर चेतातंतूंवर हल्ला करून त्यामार्फत ते मेंदूत प्रवेश करतात. (रक्‍तावाटे ते पसरत नाहीत). मेंदूत प्रवेश केल्यानंतर मेंदूला हळूहळू सूज येते व मेंदू निकामी होतो. हळूहळू रुग्ण अंथरुणाला खिळतो. साधी पाणी पिण्याची क्रियाही खूप वेदनादायक होते. पिसाळी झालेल्या रुग्णाच्या लाळेत, अश्रूत आणि लघवीत हे विषाणू मोठ्या संख्येने असतात. तरीही आतापर्यंत रुग्णापासून जवळच्या माणसाला किंवा डॉक्‍टर -नर्सला पिसाळीची लागण झाल्याची एकही घटना झालेली नाही.
भारतात दरवर्षी पिसाळी रोगाने 25000-50000 मृत्यू होतात, तरीही अशी घटना झालेली नाही हे विशेष आहे. चावल्याच्या ठिकाणी स्नायूंमध्ये विषाणू संख्येने वाढत जातात. चेतातंतूतून द्रव पदार्थाबरोबर ते कण्यातल्या चेतारज्जूमध्ये प्रवेश करतात. या जागीपण ते थोडा दाह निर्माण करतात. या दाहामुळे विषाणू जिथून निघाले त्या जागी विचित्र संवेदना होते व बधिरता येते. यानंतर चेतारज्जूतून ते संख्येने वाढत जातात आणि पेशीपेशींमार्फत ते पसरत जातात. शिवाय ते मेंदूजलातही उतरतात. तिथून मेंदूमध्ये सर्वत्र पसरायला त्यांना सोपे होते. यानंतर मेंदूतून ते चेतातंतूद्वारा लाळ-पिंडात उतरतात. तोपर्यंत त्या व्यक्तीला पिसाळीने पूर्ण ग्रासलेले असते.
अशा रितीने दुसऱ्याच्या लाळेतून माणसाच्या जखमेत, तिथून मेंदू, तिथून माणसाची लाळ असे एक जीवनचक्र हे विषाणू पूर्ण करतात. मात्र माणसात त्यांचा एक प्रकारे शेवट होतो. माणसापासून ते इतर प्राण्यांना किंवा माणसांना फारसे बाधू शकत नाहीत. स्वत:ची संख्या वाढवणे ही प्रत्येक जीवाची निसर्ग प्रवृत्ती असते. माणसात हे विषाणू संख्येने वाढतात पण पुढचा रस्ता त्यांना बंद असतो. मात्र प्राण्यांमध्ये त्यांचा प्रवास व वंश चालूच राहतो. या चार घटकांचा विचार करून जखम साधी की वाईट हे ठरवता येईल.
चाव्याचे मेंदूपासून अंतर हे विषाणू चेतातंतूमार्फत पसरतात म्हणून मेंदूपासून चावण्याच्या जखमेचे जेवढे अंतर तेवढा वेळ हे विषाणू रोग निर्माण करायला घेतात. चेह-यावरच्या जखमांतून हे जंतू काही दिवसांतच मेंदूत शिरतात. मात्र हातावरच्या जखमांपासून त्याहून अधिक वेळ लागतो; तर पायावरच्या जखमांतून मेंदूपर्यंत जायला सर्वात अधिक वेळ (कधी कधी वर्षभर) लागतो. एकदा मेंदूत पोहोचल्यावर विषाणू लवकरच लाळपिंडात उतरतात. त्यामुळे या आजाराच्या उपचारात कुत्रे चावल्याच्या जखमेचे मेंदूपासूनचे अंतर ही फार महत्त्वाची गोष्ट आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)